
झी मराठीवरील मन उडू उडू झालं ही मालिका आता अखेरच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. त्यानुसार मालिकेत सकारात्मक बदल घडवून आणले जात आहेत. हे बदल प्रेक्षकांना देखील निश्चितच अपेक्षित असणार आहेत. इंद्रा आणि दिपूच्या लग्नानंतर सानिका आणि कार्तिक घरावर आणि कंपनीवर आपला हक्क दाखवत होते. कार्तिकने तर इंद्राला त्यानेच उभारलेल्या कंपनीत नोकरी देण्यासाठी इंटरव्ह्यू घेतला होता. त्यामुळे कार्तिक आणि सानिकाचे पात्र प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जाताना दिसले होते. ही पात्र कधी एकदा समंजसपणाने वागतील आणि दीपू इंद्राचा छळ थांबवतील याकडे प्रेक्षक वाट पाहून होते. मात्र आता लवकरच कार्तिकला आपल्याकडून झालेल्या चुकांची उपरती होणार आहे.

कार्तिक आता चक्क इंद्राला कंपनीचा हक्क सोपवत आहे आणि तूच या कंपनीचा मालक आहेस असे म्हणून त्याची माफी मागत आहे. सानिका देखील लवकरच दिपूला आपलेसे करताना दिसणार असल्याने मालिकेचा हा गोड शेवट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेले आहेत. आपल्या आई बाबांचं दिपूवर सर्वात जास्त प्रेम होतं आणि आपल्या वाट्याला ते मिळालं नाही याची खंत सानिकाला कायम सतावत होती. दिपू इंद्राशी लग्न करणार हे देखील सानिकाला पसंत नव्हते. आपली सख्खी बहीण आपल्यावर रुबाब दाखवणार असा गैरसमज करून घेतलेली सानिका आता लवकरच दिपूला आपलेसे करून घेताना दिसणार आहे. खरं तर इंद्रा दिपूच्या लग्नावेळी मालिकेचा टीआरपी वाढलेला पाहायला मिळाला. या दोघांची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती. मालिकेने नुकताच ३०० भागांचा टप्पा यशस्वीपणे पार केला असे असूनही केवळ चित्रीकरणासाठी वेळ मिळत नसल्याने हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांनी मालिका इथेच थांबवणे पसंत केले. अर्थात शेवट गोड होणार असल्याने त्यांनी घेतलेल्या या निरोपाचे प्रेक्षकांनी स्वागतच केले आहे. पुढच्या आठवड्यात मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेच्या जागी तू चाल पुढं ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. दीपा परब बऱ्याच प्रतीक्षेनंतर छोट्या पडद्यावर पुनःपदर्पणासाठी सज्ज झाली आहे. तिच्या या नव्या मालिकेचीही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.