
झी मराठीवरील मन उडू उडू झालं ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिकेत नुकतेच दिपू आणि इंद्राचे लग्न झाले आहे. सानिका आणि कार्तिकला वठणीवर आणल्यानंतर ही मालिका एक्झिट घेणार आहे. या मालिकेने आणि कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे त्यामुळे मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारी ठरली आहेत. नयन कानविंदे हे पात्र अमित परबने साकारले होते. अमित परबच्या आईचे दुःखद निधन झाल्याने त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. २० जुलै २०२२ रोजी अमितच्या आईचे निधन झाले.

आईच्या आठवणीत भावुक झालेला अमित म्हणतो की, “प्रत्येक मुलाच्या आयुष्यात आईचे नुकसान नेहमीच दुःखद आणि भरून न येणारे असते. तुम्ही दिलेले विचार माझ्यात कायमच राहिल तुम्ही मला गेल्या २८ वर्षात शिकवलेल्या मूल्ये आणि नीतिमत्तेमुळे. तू खरी लढाऊ आहेस आणि तू मला तसं व्हायला शिकवलंस. ही सगळं सोपं होण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. मी फक्त देवाच्या इच्छेला सहमती दिली कारण त्याने मला खात्री दिली की त्याने तुमच्यासाठी दुसर्या बाजूने आणखी चांगल्या गोष्टींची योजना आखली आहे आणि ते माझ्यासाठी स्वार्थाचे असते जर मी तुला तुझ्या भल्यासाठी जाऊ दिले नसते. मला आनंद आहे की मी काहीतरी बनून दाखवलं. आता मी तुमच्या पुढच्या प्रवासात तुमच्यासोबत असणार नाही म्हणून कृपया स्वतःची काळजी घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. मी माझ्या पुढच्या जन्मातही माझी आई म्हणून पुन्हा भेटण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे आणि मी पुन्हा तुझ्या गर्भात येण्याची आणि तो क्षण अनुभवण्याची प्रतीक्षा करतो. तोपर्यंत कृपया विश्रांती घ्या. तुझ्या सोनूकडून खूप खूप प्रेम.”

काही दिवसांपूर्वीच अमितने मालिकेचे शूटिंग पूर्ण करून सोशल मीडियावर प्रेक्षकांना निरोप देत एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. मालिकेमुळे मला मोठी लोकप्रियता मिळाली असे तो म्हणाला होता. अमित एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. अभिनयाची आवड असल्याने त्याने या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती. त्यात त्याचे सिलेक्शन झाले होते. नयनरावांच्या भूमिकेमुळे अमितला प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. असे असले तरी झी वाहिनीमुळे अमाप प्रसिद्धी मिळाली याचा पुढे चांगला फायदा होणार हे देखील नक्की. आईच्या निधनाने अमित आणि त्याचे कुटुंबीय दुःखाच्या छायेत वावरत आहे त्याला या दुःखातून सावरण्यास बळ मिळो.