मन उडू उडू झालं मालिकेतील इंद्रा म्हणजेच अजिंक्य राऊत सध्या बेंगलोरमध्ये आहे. अजिंक्यने बेंगलोरच्या रस्त्यावरील एक स्टायलीश फोटो शेअर केला आहे. लवकरच नव्या सिनेमात अशी कॅप्शन असलेला हा फोटो बघून चाहत्यांना त्याच्या नव्या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. नव्या सिनेमासाठी बेंगलोरमध्ये कुठेतरी आहे असं म्हणत उत्सुकता ताणवत ठेवत अजिंक्यने त्याच्या बेंगलोरला येण्याचं कारण सांगितलं आहे. अजिंक्यने त्याच्या सोशल मीडियावर बेंगलोरमध्ये फिरत असल्याचा फोटो शेअर करताच अजिंक्य आता मालिकेत दिसणार नाही का असे प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केले. पण मालिकेच्या सेटवर नव्हे तर बेंगलोरच्या रस्त्यावर का फिरतोय त्याचं खास कारण सांगत अजिंक्यने नव्या सिनेमाची हिंट दिली आहे.

सध्या मालिकेतील अनेक कलाकार सिनेमांमध्ये प्रमुख भूमिकांमध्ये दिसत आहेत. तर सिनेमातील नायक हे छोट्या पडद्याकडे वळताना दिसताहेत. हा बदल प्रेक्षकांनाही सुखावत आहे. मालिकेच्या रोजच्या १६ ते १८ तासांच्या शूटिंगमधून वेळ काढून सिनेमाच्या शूटिंगच्या तारखांसाठी कलाकारांचा ब्रेक आता प्रेक्षकांच्याही सवयीचा झाला आहे. अजिंक्यनेही मालिकेतून ब्रेक घेत बेंगलोर गाठलं आहे. लवकरच मी नवी भूमिका करतोय असं म्हणत त्याने दिलेल्या बातमीचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे. मन उडू उडू झालं या मालिकेतील इंद्रजित साळगावकर म्हणजे इंद्राच्या भूमिकेतून अभिनेता अजिंक्य राऊत याने प्रेक्षकांना मनं जिंकण्यात कसूर ठेवलेली नाही. तरूणी तर त्याच्यावर फिदा आहेतच पण मुलगा असावा तर असा असं म्हणत प्रेक्षकांमधील आईबाबांच्याही पसंतीला अजिंक्य उतरला आहे. मालिकेत जरी देशपांडे सरांनी लेक दीपिकासाठी या इंद्राचा स्वीकार केला नसला तरी प्रेक्षकांचं मात्र या इंद्राला भरूभरून प्रेम मिळताना दिसतंय. या मालिकेत इंद्रा आणि दीपूच्या प्रेमाचा इमोशनल ट्रॅक सुरू आहे. मालिका रंजक वळणावर आली असताना अजिंक्यचे बेंगलोरमधले फोटो बघून सुरूवातीला चाहत्यांना असं वाटलं की अजिंक्यने मालिका सोडली का? पण मालिका सोडली नसून छोटा ब्रेक घेत तो नव्या सिनेमाचं शूटिंग करण्यासाठी गेला आहे. सध्या तरी त्याने त्याच्या नव्या सिनेमाचं नाव सांगितलेलं नाही.
