२०१८ साली कलर्स मराठी वाहिनीवर हे मन बावरे ही मालिका प्रसारित होत होती. मृणाल दुसानिस आणि शशांक केतकर यांनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. अनुश्री आणि सुध्दार्थच्या प्रेमकहाणीत सानवीची एन्ट्री झाली आणि त्यांच्या सुखी संसाराला गालबोट लागलेले पाहायला मिळाले. होणार सून मी या घरची मालिकेनंतर शशांक पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसला तर मृणाल दुसानिस हिच्या लोकप्रियतेमुळे प्रेक्षकांनी या मालिकेवर प्रचंड प्रेम दाखवले. अर्थात या मालिकेनंतर मृणाल दुसानिसने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आणि घरसंसारत रमलेली पाहायला मिळाली. नुकतेच मृणाल दुसानिसला कन्यारत्न प्राप्ती झाली ही आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावर शेअर केली. आता लवकरच या मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन होणार आहे. हे मन बावरे या मालिकेतली ही अभिनेत्री आहे सायली परब.

हे मन बावरे या मालिकेत सायली परब हिने नेहाची भूमिका साकारली होती. अनुश्रीची खास मैत्रीण नेहाच्या भूमिकेमुळे सायली परबला लोकप्रियता मिळाली होती.१ फेब्रुवारी २०२० रोजी व्यवसायाने फोटोग्राफर असलेल्या इंद्रनील शेलार सोबत सायली विवाहबद्ध झाली होती. सायली परब हिने कॉलेजमध्ये असल्यापासूनच एकांकिका नाट्यस्पर्धामधून सहभाग दर्शवला होता. लग्नानंतर सोनी मराठीवरील ‘तू सभाग्यवती हो’ या मालिकेत ती पाहायला मिळाली होती. हुतात्मा वेबसिरीज तसेच झी मराठीवरील चूक भूल द्यावी घ्यावी या मालिकेत सायलीने नळीची भूमिका निभावली होती. हे मन बावरे मालिकेमुळे सायलीला अमाप प्रसिद्धी मिळाली. सायली परब सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेली पाहायला मिळते. ‘एक नवीन सुरुवात…’असे म्हणत सायलीने लवकरच चिमुकल्या पावलांचे आगमन होत असल्याचे सांगितले आहे. सायलीने नुकतीच ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या बातमीवर मृणाल दुसानिससह अनेक सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो आहे. आयुष्याच्या या नव्या सुरुवातीसाठी सायली परब शेलार हिला अनेक शुभेच्छा!.