
मालिकांवर प्रेक्षकांची नजर खिळवून ठेवण्यासाठी कथानकामध्ये काहीना काही नवं नवीन ट्वीस्ट आणावेच लागतात. सरळ मार्गाने चाललेल्या कथेमध्ये एखादं वळण घ्यायचं असेल तर नव्या पात्राची एन्ट्री हा हुकमी एक्का मानला जातो. अशीच एक नवी एन्ट्री माझी तुझी रेशीमगाठ या प्रसिद्ध मालिकेत होणार आहे . मालिकेतील या नव्या पात्राचे नाव आहे मोहिनी. मोहिनी नेमकी आहे कोण आणि या मोहिनीच्या येण्याने मालिकेत नेमकं काय रंजक वळण येणार आहे हे येत्या काही एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील यश आणिनेहाची जोडी आणि परीचा निरागस अभिनय प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला. इतकंच नव्हे तर या मालिकेतील आजोबा, बंडू काका काकी, समीर, शेफाली, सिम्मी या आणि अशा इतर व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. यश नेहा प्रमाणेच अजून एक जोडी प्रेक्षकांना बघायला आवडते ती म्हणजे समीर आणि शेफालीची. त्या दोघांमधील भांडण प्रेमात कधी बदलणार याची वाट प्रेक्षक पाहत आहेत. समीर आणि शेफालीचं जुळवून देण्यासाठीच आता या मालिकेत एका अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. शेफालीची आई मोहिनी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे. ही भूमिका अभिनेत्री गौरी केंद्रे साकारणार आहेत. अभिनेत्री गौरी केंद्रे यांनी आजवर अनेक मराठी नाटकांतून आपलं मनोरंजन केलंय. आजपर्यंत अनेकदा प्रेक्षकांनी शेफाली च्या तोंडून तिची आई आजारी असते पण ती आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघते असे संवाद ऐकले आहेत. त्यामुळे मालिकेत लवकरच दिसणारी मोहिनी ही एक मजेशीर पात्र रेखाटणार आहे ही एक मजेदार भूमिका असणार आहे जी प्रेक्षकांना पाहायला आवडेल.

या व्यक्तिरेखेच्या एन्ट्रीमुळे समीर आणि शेफाली यांची मैत्री प्रेमात बदलेल का हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल. या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री गौरी केंद्रे म्हणाल्या, माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आहे. या लोकप्रिय मालिकेत एका रंजक वळणावर मोहिनी या व्यक्तिरेखेची एन्ट्री होतेय. मी मोहिनी म्हणजेच शेफाली च्याआईची भूमिका साकारतेय जे एक हसमुख व्यक्तिमत्व आहे. मोहिनीमुळे प्रेक्षकांना मालिका पाहताना मजा येईल. नुकतंच मालिकेत यश चे आजोबा म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांच्या जागी अभिनेते प्रदीप वेलणकर पाहायला मिळत आहेत. एखाद्या भूमिकेवर आपला ठसा उमठवणारा अभिनेता मालिकेतून बाहेर पडल्यावर त्यांची जागा घेण्यासाठी नव्या अभिनेत्याला तारेवरची कसरत करावी लागते आणि त्यात अभिनेते प्रदीप वेलणकर यशस्वी ठरताना पाहायला मिळत आहेत.