कोणत्याही मालिकेतील नायक आणि नायिकेचं नातं अगदी छान सुखासुखी झालं तर कसं चालेल बरं !आत्ता कुठे छान होतं म्हणतोय तो पर्यंत काही ना काही तरी ट्वीस्ट मालिकेमध्ये येतच असतो. खरं तर या रंजक वळणावरच मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत असते. सध्या असंच एक वळण माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेत आलं आहे. परी आणि नेहा पाठोपाठ बंडू काका काकूंचं पॅलेसमध्ये येणं हे सिम्मी काकूला अर्थातच आवडलेल नाही. आणि तिने बंडूकाकांचा अपमान नेहाला रुचलेला नाही. आता याच ट्वीस्टमध्ये यश आणि नेहा यांच्यात बिब्बा घालण्याचं काम सिम्मी काकू करणार आहे. मालिकेचा नुकताच प्रोमो प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे एकमेकांचे प्रेम व्यक्त करून जवळ आलेले नेहा आणि यश सिम्मी काकूमुळे पुन्हा दुरावणार का हे पुढच्या काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वी परीदेखील यश च्या पॅलेस मध्ये राहायला आली आहे. तिचं आणि यशचे आजोबा यांचं खूप छान बॉण्डिंग तयार झाले. पण तिकडे चाळीत मात्र परी च्या आठवणीने बंडूकाका व्याकुळ झाले. त्यांनी परी समजून दुसऱ्याच मुलीला घरी आणलं आणि त्यामुळे बरेच प्रॉब्लेम निर्माण झाले. अर्थातच नेहाला टेन्शन आलं. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून यश बंडू काका आणि काकूंना देखील पॅलेसमध्ये घेऊन आला. इथंपर्यंत मालिकेची कथा आली होती. परंतु आता पॅलेसमध्ये बंडू काकाकाकूंचं येणं हे सिम्मीला आवडलं नसल्यामुळे तिने तिच्या नेहमीच्या कारवाया करायला सुरुवात केली. बंडू काकांना लक्षात राहत नाही याचा गैरफायदा घेऊन सिम्मी काकूने बंडू काकांचा अपमान केल्याचे नेहाच्या लक्षात येत. नेहा बंडू काका आणि काकूंना घेऊन पॅलेसबाहेर पडल्याचं नव्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या यश सोबतही बोलायला नेहाने नकार दिल्याचे प्रोमोत दिसतय. त्यामुळे आता यश आणि नेहा यांच्या नात्यांमध्ये दरी येणार का ही उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

यापूर्वीही पॅलेसवर काही कारणाने आलेल्या नेहाचा सिम्मी काकूने वारंवार अपमान केला आहे. तिला तिच्या गरिबीवरून सिम्मी काकूने अनेकदा हिणवले देखील आहे. परंतु यशच्या प्रेमाखातर नेहाने याकडे दुर्लक्ष करते. पण आता मात्र बंडू काकांचा अपमान करणं हे नेहाला पटलं नाही. एरवी शांत असणारी नेहा सिम्मीला अद्दल घडवण्यासाठी सज्ज झाल्याचे या मालिकेत येत्या भागामध्ये दिसणार आहे. त्यामुळे आता नेहा सिम्मीला कशा पद्धतीने उत्तर देणार हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे. पण सिम्मी काकूच्या या सगळ्या कट कारस्थानात यश आणि नेहा यांच्यात मात्र गैरसमजाचे ढग तयार होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वीही अनेकदा यश आणि नेहा यांच्यामध्ये अशा प्रकारचा दुरावा आल्याचं प्रेक्षकांनी पाहिलं होतं. परंतु पुन्हा एकदा त्यांच्यातल्या प्रेमाने त्यांना एकमेकांच्या जवळ आणलं. पण आता मात्र बंडू काकांचा अपमान झाल्याने नेहा कोणते पाऊल उचलणार हे पाहण्यासाठी या मालिकेचे प्रेक्षक आतुर झाले आहेत .