माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा ऑफिसच्या कामानिमित्त लंडनला गेली आहे त्यामुळे तिच्या अनुपस्थितीत यशला परीची काळजी घ्यावी लागत आहे. नुकताच मालिकेत परीचा फ्रेंड ओजसचा बर्थडे साजरा करण्यात आला त्यावेळी यशने नेहाच्या चाळीतील लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला. नेहा जशी इतरांच्या मदतिला धावून जाते तशाच पद्धतीने यशने देखील बर्थडेपार्टीला शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परीदेखील त्याच्या या वागण्यावर खुश झालेली पाहायला मिळाली. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून परी आणि ओजसची चांगली गट्टी जमलेली दाखवण्यात आली आहे.

केवळ मालिकेतच नव्हे तर सेटवर देखील हे दोघे तेवढीच धमाल मस्ती करताना पाहायला मिळतात. परी प्रमाणेच ओजसला देखील आता चांगले ओळखले जाऊ लागले आहे. ओजस हा मराठी सृष्टीतील एका अभिनेत्याचा मुलगा आहे हे बहुतेकांना माहीत नसावे. ओजसचे पात्र साकारणाऱ्या बालकलाकाराचे नाव आहे ‘कृष्णा महाडीक’. कृष्णा महाडिक हा बालकलाकार मालिका तसेच जाहिरात क्षेत्रात झळकला आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून त्याचे मालिका सृष्टीत पदार्पण झाले. ही त्याने अभिनित केलेली पहिलीच मराठी मालिका आहे. या मालिकेतून प्रसिद्धी मिळालेल्या कृष्णाने नुकतेच pay tmच्या जाहिरातीत बालकलाकार म्हणून अभिनय साकारला आहे. कृष्णा हा फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील अभिनेत्याचा मुलगा आहे. अभिजित महाडिक हे त्याच्या वडिलांचे नाव. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत कीर्ती ट्रेनिंगसाठी गेलेली असते तिथेच आयपीएस विनायक माने सरांची भूमिका अभिजित यांनी निभावली आहे. अभिजित महाडिक यांनी आजवर मराठी मालिका तसेच हिंदी चित्रपट मालिकेतून काम केले आहे.

बहुतेक मालिकांमधून त्यांच्या वाट्याला पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिका आल्या आहेत. नवे लक्ष्य, जय जय स्वामी समर्थ, स्वराज्यजननी जिजामाता, सोन्याची पावलं, स्पेशल पोलीस फोर्स, नमक ईस्क का, मोलकरीण बाई, डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा मालिकांमधून अभिजित महाडिक यांनी विविधांगी भूमिका साकारलेल्या आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत कृष्णाला देखील अभिनयाची आवड निर्माण झाली. या दोघांनी गेल्या वर्षभरापासून अनेक रील व्हिडिओ सादर केले त्यातून कृष्णाला देखील लोकप्रियता मिळू लागली. यातूनच त्याला मालिकेत झळकण्याची संधी मिळाली. झी मराठीची मालिका हा नवख्या कलाकारांसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म मानला जातो. त्यामुळे कृष्णासाठी ही मालिका खूपच खास ठरली आहे. या मालिकेसाठी कृष्णा महाडिक या बालकलाकाराला मनःपूर्वक शुभेच्छा!.