
१९८९ साली ‘ मैने प्यार किया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता . सलमान खानचा हा प्रमुख भूमिका असलेला पहिलाच चित्रपट परंतु या चित्रपटाअगोदर बिवी हो तो ऐसी चित्रपटातून त्याने सहनायक साकारलेला पाहायला मिळाला होता. खरं तर मैने प्यार किया चित्रपटातील प्रेमच्या भूमिकेसाठी ‘सलमान खान खुपच लहान दिसतो…तो या भूमिकेसाठी योग्य नाही’ असे मत दिग्दर्शक सूरज बडजात्यांचे होते परंतु कालांतराने त्यांनी आपले हे मत बदलवले आणि ही भूमिका सलमान खानच करणार यावर शिक्कामोर्तब केला.

याच चित्रपटातून मराठमोळा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचे देखील हिंदी चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल पडले. एव्हाना लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी नाटक आणि चित्रपटातून आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते याचाच फायदा त्यांना हिंदी चित्रपटात काम करताना झाला. मात्र मैने प्यार कियाच्या सेटवर एक घडलेला किस्सा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एका मुलाखतीतून सांगितला होता. खूप वर्षांपूर्वी त्यांनी टीव्ही चायनलला एक मुलाखत दिली होती त्यात त्यांनी या किस्याबाबत उलगडा केला होता की, सलमान माझ्यासोबत सेटवर बोलत नसे. याचे कारण सांगताना लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाले होते की, ” मी मराठीचा नायक असल्याने आणि माझं मराठी सृष्टीत चांगलं नाव असल्याने हिंदी कलाकार थोडंस घाबरून असतात त्यामुळे मैने प्यार किया चित्रपटावेळी कोणीतरी सलमानला सांगितलं होतं की लक्ष्मीकांतपासून सावध रहा…तो आयत्या वेळेला ऍडिशन करतो. सुरुवातीला तो माझ्याशी बोलायचाच नाही मग मीच त्याला होऊन विचारल की तू असं का करतोयस? जोपर्यंत आपले ट्युनिंग होत नाही तोपर्यंत आपले सिन चांगले होणार नाहीत…भाग्यश्री तर मराठीच होती ती माझी फॅनच असल्याने आमचं चांगलं जुळून गेलं होतं परंतु सलमानसोबत जुळून यायला आम्हाला थोडा वेळ लागला.

एका सीनमध्ये दोघांना एकत्रित काम करायचं होतं त्यावेळी डायरेक्टरला मी स्वतः जाऊन सांगितलं की हा आमचा दोघांचा सिन आहे मला अव्हॉइड कर नाहीतर सगळी लोकं माझ्याकडे बघत बसतील त्यावेळी सलमानने त्याची चूक मान्य करून एकत्र सिन देण्यास सहकार्य दाखवले. मराठी सृष्टीत आम्ही असंच करतो आम्ही सर्व कलाकार नेहमीच एकत्र राहतो… अशोक सराफ यांच्यासोबत मी अनेकदा काम केलं एक धाकटा भाऊ म्हणून मला खूपदा त्यांनी सांभाळून घेतलं आहे. त्यांनी कधीच आपलं सिनिअर असणं दाखवून दिलं नाही. त्यामुळं लोकं म्हणतात की ही दृष्ट लागण्यासारखी जोडी आहे. म्हणूनच मी नेहमी हिंदी कलाकारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो .” लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दिलेल्या या मुलाखतीतून आणखी बरेचसे किस्से ऐकवले आहेत एकदा जितेंद्र यांची स्टाईल असलेली टाईट पॅन्ट घातली होती, त्या टाईट पॅन्ट मुळे खरं तर धड उठताही येत नव्हते आणि बसताही येत नव्हते.. शेवटी ती पॅन्ट फाटली म्हणून त्यांना आईच्या हातचा मार खावा लागला होता. लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सृष्टीतल दिलखुलास व्यक्तिमत्व आपल्या बोलण्यातून ते कधी कोणाची फिरकी घेतील हे सांगता येत नव्हतं. ही घटना लक्ष्मीकांत यांनी जोतेंद्र यांना ऐकवली होती. असे अनेक धमाल किस्से त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यासोबत राहताना कायम अनुभवले आहेत.