जरा हटके

“१ २ ३ ४ दे धक्का” पुन्हा एकदा नवीन प्रवासासह येतोय तुमच्या भेटीला

दे धक्का हा चित्रपट आजही अनेक जणांना आवडत असेल. आजही अनेक जण हा चित्रपट आवडीने पाहत असतील. दे धक्का या चित्रपटात एका गावातील गरीब कुटुंब आणि त्याच कुटुंबातील एका छोट्या मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाची असलेली धडपड आपल्याला पाहायला मिळाली. अशात आता अशीच अतरंगी मज्जा आणि नात्यातला गोडवा घेऊन पुन्हा एकदा या चित्रपटाचा पार्ट २ आपल्याला पाहायला मिळणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित दे धक्का २ लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात देखील आधीची सर्व पात्र दिसणार आहेत. महेश मांजरेकर यांनी स्वतः या विषयीची माहिती दिली आहे. या चित्रपटाचा एक पोस्टर टिझर रिलीज करण्यात आला आहे. महेश मांजरेकर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचा पोस्टर टिझर व्हिडिओ पोस्ट केला आहे.

mahesh manjrekar de dhakka muhurt
mahesh manjrekar de dhakka muhurt

यामध्ये आधीची सर्व पात्र दिसत आहेत. “गड्या थांबायचं नाय, आता वळायचं नाय, आता डरायचं नाय…..” असं गाणं यामध्ये ऐकू येत आहे. तसेच यामध्ये तात्या, सायली, किसना, सुमती, मकरंद हे सर्व पात्र आहेत. यात महत्वाचं म्हणजे खिसे कापण्यात पटाईत असलेला आणि आख्या जगाचा जुगाड करू शकेल असा धनाजी देखील आहे. तसेच पोस्टर टिझरमध्ये एक गोष्ट बदलली आहे. ती म्हणजे या चित्रपटात सर्वांच्या सोबतीला आलेली टमटम. जी टमटम आधी होती तिच्यात बदल झाला आहे. आता इथे थोडी नव्या जमाण्याची चार चाकी गाडी आहे. तसेच सर्व कलाकार देखील आधी पेक्षा थोडे मॉर्डन दिसत आहेत. साल २००८ मध्ये दे धक्का हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या काळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ६ कोटींहून अधिक कमाई केली होती. अशात आता दे धक्का २ येणार आहे तर हा चित्रपट देखील आधीचा आकडा नक्की मोडेल असं अनेक चाहते म्हणत आहेत. पार्ट १ मध्ये असलेली धमाल मज्जा मस्ती ही पार्ट २ मध्ये आणखीन जास्त पाहायला मिळणार आहे. पार्ट वनमध्ये आपण पाहिलं की, संपूर्ण कथा ही जाधव कुटुंबाभोवती फिरते. मकरंद (मकरंद अनासपुरे) यांनी आपली सर्व संपत्ती खर्च केल्यानंतर, एका ऑटो पार्टचा शोध लावलेला असतो.

actress medha manjrekar
actress medha manjrekar

त्याचा असा दावा असतो की, तो वाहनांच्या इंधनाचा वापर खूपच कमी करेल. पण ग्रामीण पार्श्वभूमी असल्याने आणि औपचारिक शिक्षण नसल्यामुळे त्याला कधीच गांभीर्याने घेतले जात नाही. मकरंदचे वडील सुभानराव (शिवाजी साटम) अयशस्वी प्रयत्नांसाठी आपली सर्व जमीन विकल्याबद्दल आपल्या मुलाला दोष देण्याची एकही संधी सोडत नाहीत. सुमी (मेधा) ही मकरंदची नम्र दुसरी पत्नी असते. कुटुंब आर्थिक संकटातून जात असताना, मकरंदच्या मुलीची मोठ्या बक्षीस रकमेसह नृत्य स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड होते तेव्हा एक सुवर्णसंधी समोर उभी राहते. कुटुंब आपली शेवटची संसाधने संपवते आणि स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आयुष्य बदलणाऱ्या प्रवासाला निघते. हा प्रवास प्रत्येकाला आपल्या आयुष्यात असलेल्या प्रवासा सारखा वाटतो. संपूर्ण चित्रपट या प्रवासात खूप रंजक आणि मजेदार दाखवला गेला आहे. अशात आता आणखीन विनोद आणि धमालीसह या चित्रपटाचा पार्ट २ येणार असल्याने प्रेक्षक खूप खुश आहेत. “१ २ ३ ४ दे धक्का” ५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button