मराठी चित्रपट सृष्टीतील चिरतरुण अभिनेते म्हणून महेश कोठारे यांच्याकडे पाहिले जातं. माझा छकुला, धडाकेबाज, धुमधडाका, खतरनाक, झापटलेला या आणि अशा अनेक चित्रपटातून महेश कोठारे यांनी स्वतःची दिग्दर्शक, अभिनेता म्हणून एक वेगळी ओळख बनवली होती. एका बाजूला झगमगत्या दुनियेत मिळालेले यश त्याच्याच दुसऱ्या बाजूला आलेले अपयशसुद्धा त्यांनी पचवलेले आहेत. ‘डॅम इट आणि बरंच काही’ या आत्मचरित्रातून त्यांनी आपल्या आयुष्याचा लेखाजोखा प्रेक्षकांसमोर मांडला आहे. चित्रपटातील पदार्पणाचा काळ, लक्ष्याची पहिली भेट, सेटवरच्या गमतीजमती, एकामागून एक सुपरडुपर हिट चित्रपट आणि अचानक मिळालेले अपयश या सर्वांचा आढावा त्यांनी आपल्या या पुस्तकातून मांडला आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचण्यासाठी त्यांचा जीवनप्रवास जाणून घेण्याची ईच्छा त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या या पुस्तकात एकही गोष्ट खोटी नाही जे आहे ते तुमच्यासमोर सगळं खरं खरं मांडलंय असा विश्वास त्यांनी पुस्तकाच्या अनावरण सोहळ्यात दिला होता. याच पुस्तकातला त्यांचा असा एक किस्सा आहे जो महेश कोठारे यांना घरदार विकायला लावणारा ठरला. हा किस्सा आहे १९९९ सालचा. ८ जानेवारी १९९९ रोजी महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेला ‘लो मै आगया’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात गोविंदाचा भाचा विनय आनंद प्रमुख भूमिकेत झळकला. त्याच्यासोबत मराठी चित्रपट सृष्टीतला लाडका लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे, प्रेम चोप्रा, मोहन जोशी, रिमा लागू, प्रमोद मूथु हे कलाकार सुद्धा महत्वाची भूमिका साकारताना दिसले. जवळपास दीड कोटींचे बजेट असणारा हा चित्रपट मात्र बॉक्सऑफिसवर दणकून आपटला. चित्रपटासाठी जेवढा खर्च करण्यात आला तेवढा सुद्धा खर्च भरून काढता न आल्याने महेश कोठारे यांना मोठे अपयश आले. हा चित्रपट म्हणजे माझ्या आयुष्यतील ‘सर्वात मोठी चूक’ असे ते आवर्जून उल्लेख करतात. चित्रपटामुळे मला ‘अपमान आणि बदनामी’ सहन करावी लागली, असे ते म्हणतात. या अपयशाचा फटका त्यांना पुढील १५ वर्षे सहन करावा लागला. परिस्थिती एवढी बिकट होती की यादरम्यान त्यांना स्वतःचे घर सुद्धा विकावे लागले होते. याच काळात आदिनाथला एमबीएचे शिक्षण घ्यायचे होते.

एमबीए साठी प्रवेश कसा घ्यायचा? असा प्रश्न समोर असतानाच त्यावेळी कुठून तरी तडजोड करण्यात आली, हा आमच्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ होता असा उल्लेख ते करतात. चित्रपटाच्या अपयशाने खचून न जाता महेश कोठारे यांनी मालिका सृष्टीत येण्याचे धाडस दाखवले. २०१४ सालच्या जय मल्हार या मालिकेमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सावरण्यास मोठी मदत मिळाली. या मालिकेने महेश कोठारे छोट्या पडद्यावर हिट ठरले. आज मालिका सृष्टीत त्यांचा चांगला जम बसलेला आहे. त्यामुळे मागे वळुन पाहताना आपल्या या संघर्ष काळातून आपण कसे सावरलो याची प्रेरणा कोणालातरी मिळू शकते या हेतूने त्यांनी हे आत्मचरित्र लिहिण्याचा निर्णय घेतला होता. मोठा दिग्दर्शक बनलेल्या महेश कोठारे यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत त्यावेळी उचललेलं धाडसाचं पाऊल व्यर्थ गेलं नाही असंदेखील ते म्हणतात माणूस अश्या समस्यांना सामोरा जाऊन घेतलेला त्यावेळचा तो अनुभव कधीच विसरत नाही त्यातून बरच काही शिकायला देखील मिळालं . .