आदिनाथ कोठारे या नावाच्या मध्यभागी जे नाव आहे त्या महेश कोठारे या नावामुळे सगळं काही सहज मिळेल असं वाटलं होतं, पण खऱ्या आयुष्यात तस काहीच झालं नाही बरं का. आमच्या घरात सर्वसामान्यांच्या घरासारखच वातावरण होतं, पण जे आवडेल ते करण्यासाठी पाठिंबा होता. मग काय, मी माझ्या आवडीचं पाणी चाखायचं ठरवले आणि तेच पाणी गोड लागलं. आदिनाथ कोठारे असं का म्हणाला, त्याला नेमकं कोणतं पाणी चाखायचं होतं असे प्रश्न पडले असतील ना तुम्हाला. आदिनाथ याने एका मुलाखतीत त्याच्या स्टार किड असण्याचे अनुभव शेअर केले. सध्या चंद्रमुखी सिनेमाच्या यशाने आकाशात असलेल्या आदिनाथचे पाय जमिनीवर का आहेत ते त्याच्या या गप्पांमधून चाहत्यांना समजलं.

कोणत्याही क्षेत्रातील स्टार किडकडे बघत असताना एक वेगळा चष्मा आपोआपच डोळ्यावर चढतो. या मुलाला काय कमी असणार, त्याला तर सगळं आयतं मिळत असणार. त्याला जर त्याच्या आईवडीलांच्या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर आणखीनच सगळं सोप्पं. त्यात स्टार किडस मनोरंजन क्षेत्रातील असतील तर मग काय मार्गात काहीच अडथळे नाहीत. प्रसिध्द निर्मातादिग्दर्शक महेश कोठारे यांचा मुलगा अभिनेता आदिनाथ कोठारे याच्याबाबतीतही असच बोललं जायचं. आदिनाथने एका सोशल मीडियावरील चॅनेलच्या अनौपचारीक गप्पांमध्ये तो सगळा मुलामा काढून टाकला आणि त्याच्या स्टार किडपलीकडचं आयुष्य उलगडलं. आदिनाथ म्हणाला, मी एका मोठया अभिनेता, दिग्दर्शक निर्मात्याचा मुलगा आहे हे मला घरातून कधीच जाणवू दिलं नाही. शाळा पूर्ण होईपर्यंत तर मला महेश कोठारे यांच्या प्रसिध्दीचा गर्व येणार नाही याची पुरेपूर काळजी आईनं घेतली. कॉलेजला जातानाही मी ट्रेनने प्रवास केला आहे. माझा छकुला या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केलं तरी त्यानंतर आपण स्टार कीड आहोत आणि त्यातून मिळणारी खास वागणूक मिळाली पाहिजे असं मला वाटलं नाही याला कारण माझ्या घरातलं वातावरण. आदिनाथ हा महेश कोठारे यांचा मुलगा असल्यामुळे साहजिकच घरी सिनेमाविश्वातील कलाकारांचा सहवास त्याला मिळाला. त्यातून त्याच्या मनात सिनेमाविषयीची आवड निर्माण झाली. पण त्याच्यावर कधीच बंधने घालण्यात आली नाहीत. त्या ज्या क्षेत्रात करिअर करावं वाटेल त्या क्षेत्रात जाण्याची त्याला मुभा होती.

याच मुद्द्यावरून आदिनाथने त्याला नेमकं कोणतं पाणी चाखायला मिळालं हे सांगितलं. सिनेमातील प्रवेश माझ्यासाठी सोपा असला तरी त्यात टिकून राहणं हे माझ्यावर अवलंबून होतं असं म्हणत आदिनाथने त्याची बाजू सांगितली. छोट्या छोट्या भूमिका करत असताना अभिनयाचं पाणी चाखायला आवडू लागलं आणि मग अनुभव गाठीशी येईल तसं हे पाणी गोड लागायला लागलं असं म्हणत आदिनाथने त्याचं या मनोरंजन क्षेत्रातील बस्तान कसं बसलं याची गोष्ट सांगितली. सध्या आदिनाथ चंद्रमुखी या सिनेमातील दौलतराव या भूमिकेमुळे कौतुकाचा वर्षाव झेलत आहे. त्याआधी त्याने भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांची बायोपिक असलेल्या ८३ या सिनेमात दिलीप वेंगसरकर यांची भूमिकाही निभावली. पानी या सिनेमासाठी आदिनाथने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. मोजकं पण नेटकं काम करत आदिनाथचा प्रवास सुरू आहे. पण स्टार किड म्हणजे सगळं सोप्पं नाही हे त्याने त्याच्या संघर्षातून दाखवून दिलं आहे.