Breaking News
Home / जरा हटके / महेश कोठारे यांचे वडील अभिनेते अंबर कोठारे यांचे दुःखद निधन

महेश कोठारे यांचे वडील अभिनेते अंबर कोठारे यांचे दुःखद निधन

मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे, ते ९६ वर्षांचे होते. आज बोरिवली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अंबर कोठारे यांच्या पावलावर पाऊल टाकत महेश कोठारे यांनी बालपणीच अभिनयाची कास धरली होती. अंबर कोठारे यांनी रंगभूमीपासून आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू केली. अंबर कोठारे यांचा जन्म मुंबईचाच. इथेच ते लहानाचे मोठे झाले. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने मिळेल ती कामे त्यांनी केली होती अगदी गिरगावच्या परिसरात त्यांनी उटणे विकण्याचे काम सुद्धा केलेले होते. मधल्या काळात महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे आजारी असताना डॉ. विशाल निवडुंगे यांच्यामुळे ते पुन्हा त्यांच्या पायावर उभे राहिले असल्याची चांगली बातमी महेश कोठारे यांनी शेअर देखील केली होती. डॉ. विशाल निवडुंगे तुमच्या चमत्कारिक स्पर्शानेच हे घडले. आज तुम्ही आमच्यासोबत लंचसाठी आल्याचा खूप आनंद झाला अशी सुंदर पोस्ट देखील त्यांनी शेअर केली होती.

ambar kothare family
ambar kothare family

शाळा, कॉलेजचे शिक्षण घेतल्यानंतर अंबर कोठारे यांनी बँकेत नोकरी केली होती. नोकरी करत असतानाच त्यांची पाऊले अभिनयाकडे वळली. नोकरी मुळे पोटापाण्याचा प्रश्न मिटला आणि नाटकातून काम केल्यामुळे आवडता छंद जोपासता आला. दरम्यान जेनमा सोबत त्यांचा विवाह झाला. या दोघांनी देखील रंगभूमीवर काम केलेले होते. दरम्यान महेशच्या जन्मानंतर त्याला मराठी चित्रपटात अभिनयाची संधी मिळत गेली. महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटात अंबर कोठारे झळकले आहेत. कधी इन्स्पेक्टर तर कधी खलनायकाच्या भूमिका देखील त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवल्या होत्या. झोपी गेलेला जागा झाला या नाटकाचे त्यांनी अनेक प्रयोग केले होते. रंगभूमीवरील झुंजारराव ही त्यांची भूमिका खुपवचह गाजली होती. या भूमिकेने त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली होती. आपल्या मुलाच्या दिग्दर्शन क्षेत्रात त्यांनी मोलाचा असा पाठिंबा दर्शवला होता. गेल्या काही वर्षांपासून अंबर कोठारे वृद्धापकाळाने एका जागेवर होते. त्यामुळे महेश कोठारे यांच्या डॅम इट आणि बरंच काही या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते अनुपस्थित राहिलेले दिसले. दे दणादण, खबरदार, खतरनाक अशा चित्रपटातून अंबर कोठारे यांनी आपल्या मुलाच्या चित्रपटातून अभिनयासाठी हातभार लावला होता.

mahesh kothare father ambar kothare photo
mahesh kothare father ambar kothare photo

या क्षेत्रातले अनेक बारकावे त्यांनी आपल्या मुलाला समजावून सांगितले होते. अभिनय क्षेत्रात जायचे असेल तर त्याअगोदर त्यांनी महेश कोठारे यांना शिक्षण पूर्ण करण्याची ताकीद दिली होती. वकिलीचे शिक्षण घेतल्यानंतर महेश कोठारे यांनी काही काळ वकिली केली. मात्र पुढे जाऊन अभिनय क्षेत्रात येण्याचा वाढता कल पाहून अंबर कोठारे यांनी त्यांना पाठींबा दिला होता. महेशजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक चढउतार अनुभवले त्यात त्यांच्या वडिलांचे भक्कम साथ त्यांना मिळाली होती. अंबर कोठारे यांच्या निधनाने कोठारे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मराठी सेलिब्रिटींनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर काही सेलिब्रिटींनी त्यांच्या घरी धाव घेतली आहे. आज दुपारी शोकाकुल वातावरणात अंबर कोठारे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच एक सदिच्छा.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *