महाभारत मालिकेतील श्रीकृष्णाच्या भूमिकेमुळे अभिनेते नितीश भारद्वाज हे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. २०१९ सालीच नितीश भारद्वाज यांनी कायदेशीर रित्या आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्यांनी अर्ज देखील केला असल्याचे मीडियाला सांगितले होते. अखेर तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांची दुसरी पत्नी स्मिता हिच्यापासून विभक्त झाले असल्याचे जाहीर केले आहे. स्मिता आणि नितीश यांना दोन जुळ्या मुली आहेत. देवयानी आणि शिवरंजनी अशी त्या दोघी मुलींची नावं आहेत.

सध्या या दोन्ही मुली स्मितासोबत इंदोर येथे वास्तव्यास आहेत. स्मिता गाते या आयएएस ऑफिसर आहेत. १२ वर्षांचा त्यांचा संसार घटस्फोटामुळे आता मोडला आहे. स्मिता आणि नितीश या दोघांचेही हे दुसरे लग्न होते. दोघेही पहिल्या लग्नानंतर विभक्त झाले होते. दोघांच्या जवळच्या फॅमिली सदस्याने त्या दोघांची भेट घडवून आणली होती आणि लग्नासाठी स्मिताचे स्थळ सुचवले होते. त्यानंतर मोठ्या थाटात नितीश भारद्वाजचे स्मिता सोबत लग्न झाले. १९९० साली मोनिशा पाटील हिच्यासोबत नितीश भारद्वाजने लग्नगाठ बांधली होती. मोनिशा ही शेफ आहे आणि सध्या ती युनायटेड किंगडम येथे वास्तव्यास आहे. २००५ साली मोनिशा आणि नितीश विभक्त झाले होते. आपल्या दुसऱ्या लग्नाच्या घटस्फोटाबाबत नितीश भारद्वाज म्हणतात की,’ मी या बाबतीत कमनशिबी आहे खरं तर घटस्फोटाची कारणं अनेक असू शकतात, तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वृत्तीशी तडजोड करू शकत नाही तुमचा अहंकार या नात्यात आडकाठी आणू शकतो तर कधी एकमेकांचे कुठल्या बाबतीत मतभेद असू शकतात.

जेव्हा जेव्हा असं नातं संपुष्टात येतं त्यावेळी तुमची मुलं प्रथम या गोष्टीला सामोरी जाताना दिसतात. या गोष्टींमुळे मुलांवर वाईट परिणाम होतो याला सर्वस्वी त्यांचे पालकच जबाबदार असतात’. त्यांच्या दोन्ही मुलींसोबत बोलण्याची त्यांना परवानगी आहे का असे विचारले असता मी यावर आताच काही बोलणार नाही की मला त्यांच्यासोबत बोलता येणार की नाही… नितीश भारद्वाज यांनी हिंदी मालिका तसेच चित्रपटातून महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत देखील स्वतःची ओळख बनवली आहे. समांतर, समांतर २ या मराठी वेबसिरीजमध्ये ते महत्वाच्या भूमिकेत झळकले होते. खट्याळ सासू नाठाळ सून, पितृऋण, नशीबवान, तुझी माझी जमली जोडी, पसंत आहे मुलगी अशा चित्रपटातून मुख्य नायक तसेच सहाय्यक भूमिका त्यांनी बाजावलेल्या आहेत