दीड महिना साप कात टाकतो तशी अंगावरची कातडी निघत होती…मुलगा आणि आईचा संघर्ष मधुरा यांच्या लेखातून

आज ‘मधुराज रेसिपी’च्या माध्यमातून मधुरा बाचल जगभरात पोहोचल्या. रेसिपीच्या त्यांच्या व्हिडिओजला लाखोंची पसंती मिळते. हे यश त्यांना सहजासहजी मिळालं नाही हे आपण सगळेच जण जाणतो. यामागे त्यांची मेहनत, संघर्ष या सगळ्यांचाच समावेश आहे. आज त्यांनी मुलगा आणि आईच्या नात्याचा संघर्षही चाहत्यांसोबत शेअर केला आहे. लहान असल्यापासूनच मधुरा यांचा मुलगा मंथन अनेक व्याधींनी त्रस्त होता, याबद्दल त्या स्वतःच सांगतात की, “३५ आठवडे कसं बसं पोटात राहीला. सगळंच तळ्यात मळ्यात सुरु होतं. मंथन झाला तसा काही ना काही व्याधी मागे आहेतच. कपड्यांच्या रंगाचं अल्लेर्जी निम्मित झालं आणि जन्म घेतल्या घेतल्या जवळपास दिड महीना अंगावरची कातडी साप कात टाकतो तशी निघत होती.

एक एक दिवस ढकलत लहानाचं मोठं करावं लागत होतं. आई म्हणून व्याधींसमोर हतबल झाल्यासारखं वाटत होतं. एक क्षण असा आला की बास आता! का? कशामुळे हे सगळं? या भानगडीत न पडता, पट्ठ्या बरंच पूर्वसंचीत घेऊन आला असावा असं वाटलं. तेव्हा पासून कुठलीच पळवाट न काढता माय लेकरांचा संघर्ष सुरु आहेच. होऊ देत काय व्हायचं ते लढायचं आणि मार्ग काढायचे. आपलं आयुष्य पूर्वसंचीत आणि पुण्याई या दोन्हीमध्ये झुलत असतं. मध्ये मध्ये प्रारब्ध लुडबुड करतं इतकंच. संचीत असेल तर काहीच पळवाट न शोधता लढायचं, पुण्याई असेल तर इदं न मम । शेवटचा फोटो आई म्हणून माझ्यासाठी खास आहे. लहान गटात मंथन होता. २५ जानेवारीची रात्र दीड फुटाच्या सोफ्यावरून पडायचं निमित्त झालं आणि खालचे सुळे वरच्या ओठात घुसून पूर्ण ओठ फाटला गेला होता.

आहे तसं हॉस्पिटल मध्ये मंथनला घेऊन गेलो, जखम मोठी आणि आतल्या बाजूने होती त्यामुळे टाके घालावे लागले. घरी येईस्तोवर मध्य रात्र उलटून गेली होती. दुसरा दिवस २६ जानेवारीचा मंथनचा anuual day होता. कार्यक्रमाची वेळ जवळ आल्यावर मंथनला विचारलं अरे जवळपास १ महिना यासाठी तू सराव करतोयस जायचं का annual day ला. हो म्हणाला टाके घालून १२ तासही उलटले नव्हते आणि साहेब मस्त perform करून आले. मुलांना कणखर करण्यासाठी आयांना वेळ प्रसंगी दगड व्हावं लागतंच. असो so faar, so good. अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी असूदेत !”