लोककलावंताला दिलासा देणारी बातमी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सरकारच्या निर्बंधांमुळे लोककलावंताला आपली कला सादर करता येत नव्हती. निर्बंध लावल्यामुळे अनेक कलावंतांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले होते. अनेक कलावंतांनी मग पर्यायी मार्गाचा स्वीकार करत भाजी विक्री आणि अन्य छोटे उद्योगधंदे सुरू करण्याचा प्रयत्न केला मात्र तुटपुंज्या मिळकतीमुळे अनेक अडचणी भासू लागल्या. मात्र आता या कलावंतांसाठी एक दिलासादायक बातमी जाहीर करण्यात आली आहे.

येत्या १ फेब्रुवारी २०२२ पासून तमाशाचे फड, लावणीचे फड, संगीत करांचे फड महाराष्ट्रभर गाजणार आहेत. ही बातमी नुकतीच लोककलावंत सुरेखा पुणेकर यांनी सोशल मीडियावर जाहीर केली आहे. सुरेखा पुणेकर यांनी महाराष्ट्रातील तमाम गावकऱ्यांना आवाहन केले आहे की तुम्ही यात्रा जत्रा भरवा आणि कलावंतांना मदत करा. कलावंत आज तीन वर्षांपासून उपाशी मरतायेत आणि त्यांचे यात खूप हाल झाले. सरकारने यावरील सर्व निर्बंध हटवले आहेत त्यामुळे आम्ही कलावंत त्यांचे खूपखूप आभारी आहोत. येत्या १ तारखेपासून हे तमाशाचे आणि लावणीचे फड गाजणार आहेत याचा तमाम प्रेक्षकांनी लाभ घ्यावा आणि आम्हा कलावंतांना सहकार्य करावे असे सुरेखा पुणेकर यांनी आवाहन केले आहे. दोन दिवसांपूर्वी फडमालकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व फड मालकांची एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सर्व कलावंतांना मदत म्हणून १ कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. यात समाविष्ट असलेले ३ हजार कलावंतांना प्रत्येकी ३ हजार रुपये मिळणार असल्याचे सुरेखा पुणेकर यांनी म्हटले आहे.

सप्टेंबर २०२१ मध्ये लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. लोककलावंतांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून सरकारने निर्बंध हटवावीत अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. यात अनेक लोककलावंत या मागणीचा पाठपुरावा सरकारकडे करत होती. मात्र आता त्यांच्या या मागणीवर विचार करण्यात आला असून येत्या फेब्रुवारी महिन्यापासून निर्बंध हटवण्याचे जाहीर करण्यात आले आहेत. सरकारने निर्बंध हटवताच सुरेखा पुणेकर यांनी महाराष्ट्रातील तमाम गावकऱ्यांना आपापल्या गावात जत्रा यात्रा भरवण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून लोक कलावंतांच्या पोटापाण्याचा प्रश्न दूर होईल. सरकारने निर्बंध हटवण्याचे जाहीर करताच आता तमाम लोककलावंतांनी आपला आनंद सोशिअल मीडियावर देखील व्यक्त केला आहे.