सध्या मराठी सृष्टीत सेलिब्रिटींची लग्नसराई सुरू आहे. नुकतेच अभिनेत्री हृता दुर्गुळे हिचा प्रतीक शाह सोबत साखरपुडा पार पडला. त्यापाठोपाठ आता सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम रोहित राऊत लवकरच लग्नबांधनात अडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २००९ साली झी मराठीवर सारेगमप लिटिल चॅम्प्स चा पहिला सिजन झाला होता. रोहित राऊत या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला होता. यानंतर रोहितने गायक म्हणून मराठी सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली. याच शोमध्ये जुईली जोगळेकर ही देखील स्पर्धक बनून आली होती मात्र ती फायनलपर्यंत पोहोचली नव्हती.

तेव्हापासून रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांची ओळख होती. या ओळखीचे काही वर्षांपूर्वी प्रेमात रूपांतर झाले आणि या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबुली देखील दिली. त्यानंतर दोघांचे एकमेकांसोबत मजा मस्ती करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले. नुकतेच या दोघांचे केळवण साजरे करण्यात आले होते. योगिता चव्हाण हिने रोहित राऊत आणि जुईलीचे केळवण साजरे केले होते. त्यावरून हे दोघेही नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लग्नगाठ बांधणार असे बोलले जात आहे. जुईली जोगळेकर हि मूळची पुण्याची पण सध्या ती मुंबईत वास्तव्यास आहे. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमधून तिने पदवीचे शिक्षण घेतले आहे. सारेगमप सूर नव्या युगाचा या झी मराठीवरील शोमध्ये तिने पार्टीसिपेट केले होते. या शोची ती विजेती देखील ठरली होती. या शोमुळे जुईली प्रसिद्धीच्या झोतात आली. झी युवा वरील संगीत सम्राट सिजन २ या शोमध्ये जुईली कोकण कन्या टीमची कॅप्टन बनली होती. आपल्या टीमला प्रोत्साहन देण्याचे ती काम करत होती.

कोकण कन्या या टीमच्या स्पर्धकानेच विजेतेपद पटकावले होते. जुईली आणि रोहित राऊत यांनी एकत्रित अनेक गाणी गायली आहेत तर त्यांना मराठी चित्रपटातील गाणी गायची संधी देखील मिळाली आहे. रोहित राऊत ने केवळ मराठी सृष्टीतच नाही तर हिंदी रिऍलिटी शोमधूनही आपल्या गाण्याची झलक दाखवून दिली आहे. प्रथमच सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या दुसऱ्या सिजनमध्ये त्याने परिक्षकाची भूमिका निभावली होती. त्याच्या सोबत आर्या आंबेकर, प्रथमेश लाघाटे, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैषनपायन हे गायक परीक्षकाच्या भूमिकेत दिसले होते. सारेगमप लिटिल चॅम्प्सचे हे पंचरत्न म्हणून त्यांना आजही ओळखले जाते. आता लवकरच रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या या दोघांच्याही घरी लग्नाची लगबग सुरू झाली आहे. जुईली आणि रोहित राऊत याना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…