
वर्षाच्या सुरुवातीलाच कलर्स मराठी वाहिनीवर ‘लेक माझी दुर्गा’ ही नवी मालिका प्रसारित करण्यात आली होती. अवघ्या पाच महिन्यांत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलेले पाहायला मिळत आहे. दुर्गा आणि जयसिंगची प्रेमकथा प्रेक्षकांना आवडली असून नुकताच या मालिकेने आपला १०० भागांचा टप्पा पार केलेला आहे. मात्र आता या मालिकेतून मुख्य नायिकेची एक्झिट झाल्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. मालिकेत दुर्गा आणि जयसिंगची लगीनघाई पाहायला मिळत आहे. यातच हा मोठा ट्विस्ट मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत दुर्गाची भूमिका वरदा पाटील हिने निभावली होती. मात्र काही महिन्यातच वरदाने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर वरदाची मुख्य नायिका असलेली ही पहिलीच मराठी मालिका ठरली आहे.

या अगोदर तीने अनेक हौशी नाट्यस्पर्धांमधून सहभाग दर्शवला होता. नाटकातून काम करत असतानाच तिने मॉडेलिंग केलं होतं. २०१७ साली श्रावण क्वीन या सौंदर्य स्पर्धेमध्ये ती सहभागी झाली होती या स्पर्धेची ती रनरअप ठरली होती. मेरे साईं या हिंदी मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई या हिंदी मालिकेतून वरदाला सिताबाईंची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. या मालिकेनंतर वरदा लेक माझी दुर्गा या मालिकेतून प्रथमच मराठी मालिका सृष्टीत ओळख निर्माण करताना दिसली. मात्र आता अवघ्या दोन महिन्यातच तिने ही मालिका सोडलेली पाहायला मिळत आहे. ‘ मी दुर्गाला खूप मिस करणार आहे, तुम्ही सगळ्यांनी दुर्गा वर इतकं प्रेम केलंत त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार ‘ असे म्हणून वरदाने मालिका सोडली असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. मात्र तिने ही मालिका का सोडली हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. लेक माझी दुर्गा या मालिकेत आता दुर्गाच्या भूमिकेसाठी रश्मी अनपट हिची निवड करण्यात आली आहे. रश्मीने याअगोदर आई माझी काळूबाई या मालिकेतून अशीच एन्ट्री घेतली होती. प्राजक्ता गायकवाड आणि विणा जगताप यांनी आर्याची भूमिका अर्ध्यावर सोडली होती.

या दोघींनंतर रश्मीने ही मालिका शेवटपर्यंत निभावली होती. आता आणखी एक अशीच भूमिका रश्मीच्या वाट्याला आलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे मालिकेत दुर्गाची भूमिका ती नक्कीच उत्तम निभावेल असा विश्वास प्रेक्षकांना आहे. मालिकेतला हा ट्विस्ट प्रेक्षक स्वीकारतील की नाही हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. तूर्तास मालिकेत दुर्गा आणि जयसिंगच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली पाहायला मिळत आहे. या लग्नाला जयसिंगच्या घरच्यांचा विरोध होता मात्र जयसिंगचे लग्न निशासोबत व्हावे अशी त्याच्या आईची इच्छा होती. निशासोबतच जयसिंगचे लग्न झाले आहे असा समज असणारी त्याची आई सून म्हणून दुर्गाला समोर पाहून संतापते. त्यामुळे आता मनोरमा दुर्गाला आपली सून म्हणून स्वीकारणार की तिचा तिरस्कार करणार हे मालिकेतून पाहायला मिळणार आहे.