कलर्स मराठी वाहिनीवरील लेक माझी दुर्गा या मालिकेचा आज रविवारी एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे. ही मालिका शक्ती अस्तित्व के एहसास की या हिंदी मालिकेचा रिमेक आहे. मालिकेच्या एक तासाच्या विशेष भागात चिमुरड्या दुर्गाची एक्झिट होणार आहे. मालिका अनेक वर्षे लीप घेत असल्याने दुर्गा आता मोठी झालेली पाहायला मिळणार आहे. एवढे वर्षे ज्या बापाने दुर्गाला झिडकारले होते त्याला आता ती आपली लेक असल्याची उपरती झाली आहे. दुर्गाचे सत्य महेशने स्वीकारले असून ती आपली लेक आहे आणि तू दुर्गा आहेस तू माझे डोळे उघडलेस असे तो तिला जवळ घेताना म्हणतो आहे.

मालिकेत चिमुरड्या दुर्गाची भूमिका निधी रासने हिने साकारली होती. आज मालिकेच्या विशेष भागात ही दुर्गा आता मोठी झाली असल्याने निधीची मालिकेतून एक्झिट झाली आहे. आता दुर्गाची भूमिका अभिनेत्री वरदा पाटील साकारताना दिसणार आहे. वरदा पाटीलची लेक माझी दुर्गा या मालिकेत मुख्य नायिकेच्या भूमिकेत एन्ट्री झाली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही दुर्गा नटून थटून घराबाहेर पडली आहे तिथेच ती एका उदघाटनाच्या कार्यक्रमात आपली गाडी घुसवताना दिसणार आहे. यात ती मालिकेच्या नायक शिवला जाऊन धडकणार आहे. हा नायक साकारला आहे अभिनेता स्वप्नील पवार याने. वरदा पाटील हिने अनेक हौशी नाट्यस्पर्धांमधून सहभाग दर्शवला होता. नाटकातून काम करत असताना तिने मॉडेलिंग देखील केलं आहे. २०१७ साली श्रावण क्वीन या सौंदर्य स्पर्धेमध्ये ती सहभागी झाली होती या स्पर्धेची ती रनरअप ठरली होती. मेरे साईं या हिंदी मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर आगमन केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई या हिंदी मालिकेतून वरदाला सिताबाईंची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती.

या मालिकेनंतर आता वरदा मराठी मालिका सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडताना दिसत आहे. लेक माझी दुर्गा या मालिकेतून प्रथमच ती मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. वरदा पाटील आणि स्वप्नील पवार या मालिकेचे मुख्य नायक आणि नायिका असणार आहेत. स्वप्नील पवारला या अगोदर तुम्ही मुलगी झाली हो या लोकप्रिय मालिकेत पाहिले आहे. यात त्याने दिपकची भूमिका साकारली होती. स्वप्नीलने साकारलेला दीपक प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. त्यामुळे त्याची लेक माझी दुर्गा मालिकेतील शिवची भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास वाटतो. वरदा पाटील आणि स्वप्नील पवार या दोघांनाही नव्या मालिकेनिमित्त खूप खूप शुभेच्छा !.