साधारण दोन दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मालिकांच्याबाबत वक्तव्य केले होते की, ‘प्रेक्षकांनी स्वतःच्या निवडीसंदर्भात स्वतःवर काही बंधने घातली पाहिजेत. प्रेक्षकांनी भिकार मालिका बघणे बंद करावे, रिमोट तुमच्या हातात आहे. काय पाहायचं आणि चांगलं काय घ्यायचं याचा शोध घ्या म्हणजे नको त्या मालिका आपोआप बंद होतील. मालिकांमधून वैचारिक मिळत नसेल तर प्रेक्षकांनी स्वतःचा वेळ वाया घालवू नये.’ प्रेक्षकांनी अशा मालिका पहिल्याच नाही तर चांगले लेखक चांगले दिग्दर्शक आणि चांगले नट यांची शोधाशोध सुरू होईल. विक्रम गोखले यांचे मत अगदी योग्य असल्याचे अनेक प्रेक्षकांनी म्हटले आहे.

याच पार्श्वभूमीवर हेमांगी कवीला देखील तिच्या चाहत्याने एक प्रश्न विचारला आहे. हेमांगी कवी सध्या कलर्स मराठी वर दाखल होत असलेल्या ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुशील इनामदार आणि हेमांगी कवी या मालिकेतून मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. १४ फेब्रुवारीपासून रात्री ७.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या निमित्ताने हेमांगीने तिच्या चाहत्यांना मालिका पाहण्याचे आवाहन केले आहे. मात्र अशातच एका चाहत्याने तिला म्हटले आहे की, ‘ मॅडम जरा तुमची ओळख असेल झी मराठीवर तर त्या स्वीटूची मालिका बंद करायला सांगा ना खूपच बोर होत आहे’ . चाहत्याच्या या आवाहनाला हेमांगी कवीने देखील उत्तर दिले आहे. ‘ आपल्याकडे रिमोट आहे, चेंज करा किंवा आमची मलिका सुरू होईस्तोवर १४ फेब्रुवारी पर्यंत थोडी कळ सोसा…’ अर्थात हेमांगी कवीला देखील नेटकाऱ्यांकडून तिच्या या नव्या मालिकेबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. शेवटी काय पाहायचं आणि काय नाही हे सर्वस्वी प्रेक्षकांच्या मनावर अवलंबून असतं. माझी मालिका चांगली आहे मात्र ती तुम्ही पहावीच म्हणून मी तुमच्यावर सक्ती केलेली नाही. आमची मालिका आवडली नाही तर रिमोट तुमच्या हातात आहेच.

अभिनेते विक्रम गोखले असो किंवा हेमांगी कवी प्रेक्षकांना जे पाहायचंय ते, ते पाहणारच. प्रेक्षकांना ज्या मालिका रुचल्या नाही त्या मालिकांनी काही महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेतलेला आहे. पुरेसा प्रतिसाद मिळाला नसल्याने अशा मालिका आपोआप बंद पडल्या आहेत. मात्र बहुतेक मालिका चांगले कथानक असूनही केवळ टीआरपी मिळत नसल्याने त्यांच्यावर मालिका बंद करण्याची वेळ आली. विवाहबाह्य संबंध असो वा गुन्हेगारीवर भाष्य करणाऱ्या मालिका सध्या टीव्ही वाहिनीवर जास्त लोकप्रिय ठरत आहेत. यातून उत्तम काय घ्यायचं हा ज्याचा त्याचा निर्णय असला तरी या गोष्टींचा विचार होणे खरंच गरजेचे आहे…