कोल्हाट्याचं पोर या आत्मचरित्राचे लेखक डॉ किशोर शांताबाई काळे यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या आईची हक्काच्या घरासाठी वणवण चालू आहे. यासाठी त्या शासनाकडे दाद मागताना दिसत आहे. शांताबाई काळे या लावणी कलावंत होत्या. कोल्हाटी समाजात राहून, लावणी करत असताना अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलाला डॉक्टर बनवलं होतं. आपल्या आयुष्याचा हा प्रवास किशोर यांनी त्यांच्या कोल्हाट्याचं पोर या आत्मचरित्रात वर्णन केलेला होता. मात्र हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्यांना समाजाने बहिष्कृत देखील केले होते. पुस्तकावर कोल्हाटी समाजाने बंदी घालण्याची मागणी केली होती. यावर अनेक वाद झालेले होते. आपल्या हक्काचे घर आपल्याला परत मिळावे म्हणून शांताबाई शासनाची मदत घेऊ इच्छित आहेत.

मुलाचे निधन झाल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली नाहीतर मी घरासाठी का फिरले असते अशा त्या मीडियाशी बोलताना म्हणाल्या. शांताबाई काळे यांच्या मुलाचा दोन एकर जागेत दवाखाना होता. ही जागा त्यांनी शांताबाई यांच्या बहिणीच्या नावे केली होती. त्यामुळे आता या दवाखान्यावर बहिण तीचा हक्क गाजवत आहे. मुलाचा दवाखाना बहिणीने बळकावला असे त्या म्हणत आहेत. याशिवाय गावी वडिलोपार्जित त्यांची १६ एकर जमीन आहे मात्र जवळच्याच नातेवाईकांनी त्यावर सुद्धा मालकी हक्क गाजवला आहे. मी माझ्या हक्काची जागा आणि घर मिळावं म्हणून संघर्ष करत आहे. मुलाचा अपघात कसा झाला हे मला माहित नाही मात्र मी सुद्धा माझा जीव मुठीत घेऊन जगते आहे. स्वतःच्या हक्काच्या घरासाठी शासनाकडे त्यांनी तगादा लावला आहे. जवळच्याच नातेवाईकांनी आपल्याला फसवलं अशी भावना त्या व्यक्त करत आहेत. आपल्याला न्याय मिळावा म्हणून त्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. सध्या शांताबाई या भाड्याच्या घरात राहतात. त्यांना पेन्शन मिळते मात्र यातून घरभाडे देणे तसेच इतर खर्च भागवणे आता त्यांना शक्य नाही असे त्या म्हणाल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून शांताबाई यांची ही परवड मीडिया माध्यमातून दाखवण्यात आली.

त्यामुळे त्यांच्या मदतीला आता बच्चू कडू धावून आलेले पाहायला मिळत आहेत. आज सोलापूर येथे बच्चू कडू यांनी शांताबाई काळे यांची भेट घेतली. त्या मला आईसमान आहेत, पुढच्या वेळेला त्या त्यांच्या हक्काच्या घरात असतील असे त्यांनी शांताबाईना आश्वासन दिलेलं आहे. बच्चू कडू यांच्या भेटीनंतर शांताबाईंची परवड थांबेल अशी आशा सर्वानाच आहे. त्यांचा हा संघर्ष आता थांबेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुलाला लहानाचं मोठं केलं तो परिस्थितीशी झगडला चांगला शिकला मोठा झाला आपल्या पायावर उभा झाला पण अचानक झालेल्या त्याच्या मृत्यूनंतर आईवर पुन्हा अशी वेळ येणे आणि स्वतःच्याच बहिणीने दवाखाना घशात घालणे होत असलेला मनस्थाप खरोखरच असहनीय आहे. अश्या अनेक महिला अशी अनेक मुले आजही आपल्या पतीच्या किंवा वडिलांच्या पाश्च्यात स्वतःच्याच नातेवाईकांकडून फसवणूक झाल्याच्या अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात.