बहुतेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या बालपणीची आठवण शेअर करताना दिसतात. असाच एक बालपणीचा फोटो शेअर करून झी मराठीवरील लोकप्रिय अभिनेत्याने “लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठं स्वप्न होतं ऍक्टर बनायचं”…असे कॅप्शन देऊन हा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. फोटोतील हा चिमुरडा आहे अभिनेता “निखिल चव्हाण”. झी मराठीवरील ‘लागीरं झालं जी’ या लोकप्रिय मालिकेतून निखिलने विक्रम राऊत उर्फ विक्याची भूमिका गाजवली होती. या भूमिकेसाठी त्याला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले होते.

विक्याच्या भूमिकेमुळे निखिल प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला आणि आपल्यालाही असाच एक मित्र असावा अशी आशा निर्माण करून गेला. मालिकेतली त्याची झालेली एक्झिट मात्र अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारी होती हे लागीर झालं जी चा प्रेक्षक कधीच विसरणार नाही. निखिल चव्हाण हा मूळचा पुण्याचा कॉलेजमध्ये असताना अनेक एकांकिका नाट्यस्पर्धेत त्याने सहभाग दर्शवला होता. लागीर झालं जी आणि देवमाणूस मालिकेतील किरण गायकवाड हा निखिल चा कॉलेजपासूनचा चांगला मित्र दोघांनी एकत्रित अनेक नाटकांतून काम केले आहे तेव्हापासूनची त्यांची मैत्री अशीच अबाधित असलेली पाहायला मिळते. कॉलेज, नाटक असा प्रवास सुरु असताना २०१४ साली निखिलने बालगंधर्व रंगमंदिराच्या महोत्सवात लाईट्स ऑपरेट केले होते त्याच बालगंधर्व रंगमंदिरच्या सुवर्ण महोत्सवात २५ जून २०१८ साली अभिनयाचे पारितोषिक त्याने पटकावले होते ही त्याच्यासाठी मोठी कौतुकाची थाप ठरली होती. लागीर झालं जी मालिकेनंतर निखिल ऍट्रोसिटी, गर्ल्स, स्त्रीलिंगी पुल्लिंग, वीरगती, डार्लिंग अशा चित्रपट आणि वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आला.

ऍट्रोसिटी चित्रपटातून त्याने विरोधी भूमिका साकारली होती तर गर्ल्स चित्रपटात तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळाला. सहाय्यक अभिनेता ते कारभारी लयभारी मालिकेतला प्रमुख नायक अशी त्याची लोकप्रियता दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे. कारभारी लयभारी मालिकेत त्याने प्रमुख नायकाची तगडी भूमिका साकारली आहे परंतु को’ रो’नाच्या काळात या मालिकेने थोडासा ब्रेक घेतलेला पाहायला मिळाला. आता बहुतेक सर्वच मालिकांचे शूटिंग पूर्ववत झालेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे कारभारी लयभारी ही मालिका देखील नवे एपिसोड्स घेऊन प्रेक्षकांसमोर आली. यात अनुष्का सरकटे सोबतची त्याची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे. अभिनयाचा त्याचा हा चढता आलेख भविष्यात आणखी उंचच उंच भरारी घेण्यास त्याला नक्कीच कामी येईल याबाबत शंका नाही. त्याच्या पुढील वाटचालीसाठी निखिलला खूप खूप शुभेच्छा…