सोनी मराठी वाहिनीवर ४ ऑक्टोबर पासून ‘कुसुम’ ही नवी मालिका दाखल होत आहे. स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला असून त्याजागी म्हणजेच रात्री ८.३० वाजता कुसुम ही मालिका प्रसारित होत आहे. लागीर झालं जी मालिकेतील शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत कुसुमच्या भूमिकेत झळकत आहे. तिच्यासोबत अभिनेता “अजिंक्य ननावरे” हा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. सासरी राहून नोकरी आणि संसार सांभाळत असताना माहेरच्यांची देखील तितकीच जबाबदारी स्वीकारणारी आधुनिक विचारांची कुसुम या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मालिकेत शिल्पा नवलकर, आरती मोरे, राहुल मेहेंदळे यांच्या देखील महत्वाच्या भूमिका असणार आहेत. मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणारा अजिंक्य ननावरे हा नुकताच कलर्स मराठी वरील ‘बायको अशी हवी’ या मालिकेत आदित्य राजेशिर्केच्या भूमिकेत झळकला होता. अजिंक्य ननावरे हा मूळचा सताऱ्याचा. मुंबई युनिव्हर्सिटी मधून त्याने पदवीचे शिक्षण घेतले असून त्याला अभिनयासोबतच फोटोग्राफीची देखील विशेष आवड आहे. ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेतून त्याने मराठी मालिका सृष्टीत पदार्पण केले होते. सख्या रे, तू जीवाला गुंतवावे, गर्ल्स हॉस्टेल या मालिका आणि वाडा चिरेबंदी, हे मृत्युंजय या गाजलेल्या नाटकातून त्याने महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. अजिंक्य गेल्या ६ वर्षांपासून मराठी हिंदी मालिका तसेच चित्रपट अभिनेत्री “शिवानी सुर्वे” हिला डेट करत आहे. तू जीवाला गुंतवावे या मालिकेत शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे एकत्रित झळकले होते तेव्हापासूनच त्यांच्यात मैत्रीचे सूर जुळून आले आणि प्रेमाची कुठलीही कबुली न देता ते एकमेकांच्या प्रेमात पडले. या निर्णयाबाबत त्यांनी घरच्यांना देखील सांगितले त्यावेळी त्यांच्या लग्नाला घरच्यांकडून संमती मिळाली मात्र ‘आताच लग्नबांधनात न अडकता आपल्या करिअरकडे लक्ष्य दया’ असा सल्ला देखील त्यांनी दिला.

अजिंक्य शिवानीबाबत असेही म्हणतो की, शिवानीने तिचे करिअर स्वतःच्या जिद्दीवर घडवले आहे. तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाकीच्या असताना देखील त्याला उभारी देण्याचे काम शिवानीने केले आहे. त्यामुळे मी तिला खूप जवळून ओळखतो आणि आता लवकरच आम्ही लग्न करण्याच्या विचारात देखील आहोत असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. देवयानी या मालिकेमुळे शिवानी सुर्वेला प्रसिद्धी मिळाली होती. नव्या, फुलवा, अनामिका, जाना ना दिलं से दूर, ट्रिपल सीट अशा हिंदी मालिका आणि मराठी चित्रपटातून शिवानी मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली होती. बिग बॉसच्या २ऱ्या सिजनमध्ये देखील ती सहभागी झालेली दिसली.