
अभिनेत्री क्षिती जोग सध्या फसक्लास दाभाडे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशाच एका मुलाखतीत बाप लेकीचा बिनधास्तपणा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. अनंत जोग यांनी केवळ मराठीत नाही तर हिंदी सृष्टीतही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनय क्षेत्रात येण्यासाठी अगोदर त्याची आवड असायला हवी असे आनंद जोग यांचे म्हणणे आहे. या बाप लेकीचं नातंही तेवढंच दिलखुलास आहे. क्षिती ही त्यांची एकुलती एक मुलगी. त्यामुळे क्षितिसाठी एक हळवा कोपरा त्यांच्या मनात कुठेतरी पाहायला मिळतो.

तिच्या बाबतीत घडलेल्या दोन प्रसंगामुळे अनंत जोग यांना खूप वाईट वाटले होते. त्यातला एक किस्सा म्हणजे क्षिती सातवीत शिकत होती. तिच्या शिक्षकाने तिला हातावर छडी दिली होती. घरी येईस्तोवर तिच्या हातावरचा वळ तसाच होता ते पाहून अनंत जोग दुसऱ्या दिवशी थेट क्षितिच्या शाळेत गेले. प्रिन्सिपलला भेटले आणि अमुक अमुक मुलीचा मी वडील आहे आणि ह्या ह्या सरांनी तिला मारलं अशी तक्रार केली.

तेवढ्यात त्यांच्या समोरच ते शिक्षक आले, “तुमच्याबद्दलच मी तक्रार द्यायला गेलो होतो, ती तक्रार मी दिलेली आहे. आता तुम्हाला एक विनंती करतो की, माझ्या मुलीच्या हातावर वळ दिसतायेत तुम्ही मारल्याचे…तर यापुढे ते दिसणार नाहीत याची काळजी घ्या. तशी तुम्ही जर काळजी घेतली नाही तर तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना कधीच दिसणार नाहीत”.