झी मराठी वाहिनीवर किचन कल्लाकार हा नवा कुकरी शो प्रसारित केला जात आहे. या शोमध्ये वेगवेगळ्या सेलिब्रिटींना आमंत्रीत करून त्यांच्याकडून पदार्थ बनवून घेतला जातो. सांगितलेला पदार्थ बनवत असताना सेलिब्रिटींची उडालेली तारांबळ प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करताना दिसत आहे. या शोचे सूत्रसंचालन संकर्षण कऱ्हाडे करत आहे तर प्रशांत दामले परिक्षकाची भूमिका बजावत आहेत. तर दुकानाचा मालक ‘शेठ’ ची भूमिका अभिनेता प्रणव रावराणे साकारत आहे. प्रणव रावराणे याला तुम्ही अनेक चित्रपटातून मुख्य भूमिकेत तर कधी सहाय्यक भूमिकेत पाहिले आहे.

दुनियादारी या चित्रपटात प्रणवने सॉरीची भूमिका गाजवली होती. रमेश मोरे यांच्या चिंतन संस्थेतून त्याने अभिनयाचे धडे गिरवले होते. दरम्यान हस्यसम्राट, फु बाई फु या शोमधून त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. हस्यसम्राटचा तो विजेता देखील झाला यामुळे प्रणव स्टँडअप कॉमेडियन म्हणून ओळख मिळवू लागला होता मात्र अभिनेता बनायचंय यासाठी त्याची धडपड चालूच होती. वाऱ्यावरची वरात या नाटकात त्याला अभिनयाची संधी मिळाली होती. या नाटकाला हर्षदा खानविलकर आणि संजय जाधव यांनी हजेरी लावली होती. यातूनच पुढे दुनियादारी चित्रपटात सॉरीच्या भूमिकेसाठी त्यांनी प्रणवची निवड केली. या चित्रपटामुळे प्रणवला अमाप प्रसिद्धी मिळाली. पुढे वासूची सासू या नाटकात प्रणवला स्त्रीपात्र मिळाले. सासूची भूमिका तूच करणार असे दिग्दर्शक मंगेश कदम यांनी प्रणवला सांगितले होते. त्याने साकारलेली सासू देखील सुपर डुपर हिट ठरली. आटपाडी नाईट्स, प्रीतम, मस्का, विठ्ठला शप्पथ, बार्डो, अजुनी या चित्रपटातुन त्याच्या अभिनयाचा यशस्वी प्रवास पुढे चालूच राहिला.

अभिनेता प्रणवने या चित्रपटातून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या अंबरनाथ फिल्म फेस्टिव्हल मध्ये प्रीतम चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक त्याला मिळाले आहे. प्रणवची पत्नी अमृता सकपाळ रावराणे ही देखील अभिनेत्री आहे. १८ डिसेंबर २०१६ रोजी अभिनेता प्रणव आणि अभिनेत्री अमृता सकपाळ दोघांनी मोठ्या थाटात लग्न केले होते. सध्या झी मराठीवरील घेतला वसा टाकू नको या मालिकेत महाराणी सुमाताची भूमिका ती साकारत आहे. अवघाची हा संसार, वहिनीसाहेब, लज्जा, मंगळसूत्र, पारिजात, माझे मन तुझे झाले, माझिया प्रियाला प्रीत कळेना, दुर्वा, नकुशी, प्रेम पॉइजन पंगा अशा अनेक गाजलेल्या मालिकांमधून अमृताने महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. अमृता आणि प्रणव रावराणे या दोघांनाही पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…