
मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा महाअंतिम सोहळा काल पार पडला होता. विशाल निकम हा या सिजनचा विजेता ठरला आहे. विशाल निकम विजेता होणार हे सुरुवातीपासूनच बोलले जात होते. बिग बॉसच्या घरात आपल्या नावाची पाटी देखील त्यानेच सर्वात शेवटी उचलली होती. जय आणि विशाल हे दोन टॉपचे स्पर्धक घोषित झाले त्यावेळी विकास मात्र उदास झाला होता पण विशाल टॉप दोनमध्ये आहे म्हणून तो त्याच्यासाठी खुश देखील झाला. विकासप्रमाणे मिनलला देखील यशाची अपेक्षा होती टॉप ४ मध्ये तिला जाता आले नाही याची खंत तिने व्यक्त केली होती.

आपण विजेता ठरणार ही अपेक्षा त्यांनी ठेवली असल्यानेच बाद झाल्यावर हे दोघेही काहीसे नाराज झाले होते. बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यात मात्र एका सदस्याने येण्याचे आवर्जून टाळले हे बहुतेकांच्या लक्षात आले नसावे. ही स्पर्धक होती शिवलीला पाटील. शिवलीला पाटील यांचे बिग बॉसच्या घरात जाणेच सर्वांना खटकले होते. सोशल मिडियावरच नव्हे तर महाराष्ट्रातील संप्रदाय समजातील अनेकांनी त्यांना धारेवर धरले होते. इथून पुढे आम्ही त्यांचे कीर्तन ऐकणार नाही अशी भूमिकाच त्यांच्याविरुद्ध घेण्यात आली होती. त्यामुळे बिग बॉसच्या घरात येण्यामागचा आपला हेतू नेमका काय होता याचा खुलासा त्यांनी केला होता. आठ दिवसांच्या कालावधीत शिवलीला पाटील बिग बॉसच्या घरात राहिल्या मात्र ह्या घरात नेमकं कसं वागायचं हेच त्यांना समजत नव्हतं. मला हा खेळ समजलाच नाही असं स्पष्ट शब्दात त्यांनी मत मांडलं होतं. मी ह्या घरात कीर्तनकार म्हणून आले आपली परंपरा कानाकोपऱ्यात पोहोचावी याच उद्देशाने मी ह्या घरात आले होते अशी बाजू त्यांनी मांडली होती मात्र काही दिवसातच आजारी असल्याचे कारण सांगून बिग बॉसच्या घरातून त्यांनी काढता पाय घेतला होता.

त्यानंतर शिवलीला पाटील यांनी गावोगावी जाऊन कीर्तन सोहळे केले मात्र काही जणांनी त्यांच्या कीर्तन करण्यावर आक्षेप नोंदवला त्यावेळी त्यांनी समस्त वारकरी संप्रदायाची हात जोडून माफी मागितली होती. आपल्यावर टीका केली जात असल्याचे पाहून त्यांनी पुन्हा बिग बॉसच्या घरात जाणार नसल्याचा निर्णय घेतला होता. याच कारणास्तव शिवलीला पाटील महाअंतिम सोहळ्याला देखील उपस्थित राहू शकल्या नाहीत. शिवलीला पाटील या तरुण महिला कीर्तनकार म्हणून ओळख मिळवून गेल्या होत्या. सोशल मीडियावर त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी अनेकजण त्यांना फॉलो करत होते. बिग बॉसचा शो त्यांच्या आयुष्यातला कठीण काळ ठरला असे म्हणायला हरकत नाही. मात्र असे असले तरी अनेक लोकांनी शिवलीला पाटील यांना पुन्हा कीर्तन करण्यास पाठिंबा दर्शवलेला दिसून आला.