प्रसिद्ध कीर्तनकार, प्रबोधनकार बाबा महाराज सातारकर यांचे आज मुंबईतील नेरुळ येथे दुःखद निधन झाले आहे. ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने शांत, संयमी तसेच प्रभावी व्यक्तिमत्व गमावल्याची खंत सर्वच स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे. बाबा महाराज सातारकर यांची कीर्तन खूप गाजली होती. टीव्ही माध्यमाद्वारे त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमांचे प्रसारण होत असे. त्यांचा आवाजही अतिशय गोड आणि खणखणीत होता. आजही युट्युबवर असलेला त्यांनी गायलेला हरिपाठ सर्व भाविकांच्या मनावर मोहिनी पाडून जातो. ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी हा त्यांचा जीव की प्राण .
नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे त्यांचं पूर्ण नाव. सातारा येथील नामवंत गोरे सातारकर घराण्यात त्यांचा जन्म. बाबा महाराज सातारकर यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आलेली होती. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जाते. प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली होती. हरिविजय, भक्तिविजय या ग्रंथांवर ते प्रवचने सादर करत असत. त्यांच्यानंतर त्यांचे दुसरे सुपुत्र अप्पामहाराज सातारकर यांनी फडाची धुरा सांभाळली. इ.स. १९६२ साली अप्पामहाराजांचे निधन झाल्यावर अप्पामहाराजांचे पुतणे नीळकंठ म्हणजेच बाबामहाराज सातारकरांनी फडाची परंपरा सांभाळली.
त्यांनी गेलेली भजन कीर्तने आजही लोक आवडीने पाहतात, ऐकतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागात तर त्यांचा हरिपाठ आवडीने ऐकला जातो. बाबा महाराज सातारकर यांचा अंत्यविधी उद्या सकाळी नेरुळ मुंबई येथे पार पडणार आहे. वारकरी संप्रदायाचा प्रसारक हरपला अशी दुःखद भावना आपसूकच व्यक्त होत आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नी रुख्मिनी सातारकर यांचेही वृद्धापकाळाने निधन झाले होते. पत्नी पश्चात काही दिवसातच बाबा महाराज सातारकर यांनी देखील आज अखेरचा श्वास घेतला.