आज १४ डिसेंबर रोजी अभिनेता किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांच्या लग्नाचा सोहळा पार पडला. काल सावंतवाडी पॅलेसमध्ये कलाकार मंडळी दाखल झाली होती. पूर्वा शिंदे, निखिल चव्हाण, तेजपाल वाघ, महेश जाधव, नितीश चव्हाण, शिवानी बावकर, देवेन्द्र गायकवाड, श्वेता शिंदे, रुख्मिनी सुतार, पार्थ घाडगे अशी देवमाणूस, लागीरं झालं जी, तिकळी या मालिकेतील बरीचशी मंडळी सावंतवाडीत दाखल झाली होती. काल दुपारी किरण आणि वैष्णवीचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर संध्याकाळी हळद आणि संगीत सोहळ्याची धामधूम सजलेली दिसली.
हळदीला किरणच्या आईनेही गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळाला. तर संगीत सोहळ्यात किरण आणि वैष्णवीचा रोमँटिक परफॉर्मन्स पाहायला मिळाला. आज या दोघांच्या लग्नाचा थाट पाहण्यासाठी सगळेचजण खूप उत्सुक होते. देवमाणूस २ या मालिकेमुळे वैष्णवी आणि किरणची पहिली भेट घडून आली. मालिका संपल्यानंतर किरणने वैष्णविला लग्नासाठी मागणी घातली. किरणच्या या प्रस्तावाचा तिने स्वीकार केला. आणि आता दोघांचे हे लग्न पाहून सगळेचजण खुश झाले आहे. वैष्णवी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा या शहरात लहानाची मोठी झाली. शालेय शिक्षणात अतिशय हुशार असलेल्या वैष्णवीने बोर्डाच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला होता.
पुढील शिक्षणासाठी ती रुपारेल कॉलेजमध्ये गेली असताना नाटकाशी तिचा संबंध जुळला. यातूनच शाळा या सिरीजमध्ये तिला झळकण्याची संधी मिळाली. देवमाणूस२, तिकळी, तू चाल पुढं अशा मालिकांमधून ती महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळाली. आता किरण सोबत लग्नगाठ बांधल्यानंतरही ती या क्षेत्रातला प्रवास असाच सिरू ठेवणार की नाही हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. तूर्तास वैष्णवी आणि किरण गायकवाड यांना आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!.