झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेतील अभिनेत्री खुशबू तावडे हिने मालिका सोडल्याचे जाहीर केले आहे. अर्थात त्याला कारणही तसेच खास आहे. खुशबू तावडे ही दुसऱ्यांदा आई होणार आहे. गेली सात आठ महिने गरोदर असूनही खुशबू तावडे मालिकेत काम करत राहिली. पण आता तीने या मालिकेला निरोप दिलेला पाहायला मिळतो आहे. सारं काही तिच्यासाठी या मालिकेत खुशबूने उमाईचे पात्र साकारले होते. हळवी , समंजस अशी एक भावनिक बाजू तिने उमाई साकारताना मांडली होती. पण आता विश्रांतीच्या कारणास्तव तिने या मालिकेतून काढता पाय घेतला आहे.
एकीकडे आईपणाचा सुंदर अनुभव घेत असताना दुसरीकडे मात्र तिला या मालिकेला निरोप द्यावा लागत आहे. पण वाहिनीने, निर्मात्या टीमने मला खूप छान सांभाळून घेतले म्हणून तिने त्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान खुशबुने या मालिकेला निरोप दिला असला तरी आता तिने साकारलेल्या उमाईसाठी एका तगड्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे. ही अभिनेत्री आहे पल्लवी वैद्य. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेनंतर जवळपास ४ वर्षाने पल्लवी वैद्य यांना झी मराठीवर झळकण्याची संधी मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पल्लवीने स्टार प्रवाहच्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेला निरोप दिला होता. त्यानंतर आता उमाईच्या भूमिकेसाठी पल्लवी सज्ज झालेली पाहायला मिळत आहे.
नुकतेच पल्लवीने या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तिला उमाई भूमिकेत पाहून प्रेक्षक थोडेसे नाराज होण्याची शक्यता आहे. पण असे असले तरी पल्लवी तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात नक्कीच जागा बनवेल असा विश्वास आहे. २०२१ मध्ये खुशबू तावडेने पहिल्या अपत्याला जन्म दिला होता. तिचा मुलगा राघव आता जवळपास ३ वर्षांचा होईल. यामुळे खुशबुने दुसऱ्या अपत्याचा विचार केला आहे. त्याचसाठी तिला या मालिकेला निरोप द्यावा लागला आहे.