दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेता मोहन जुनेजा यांचे आज निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते गंभीर आजाराशी झुंज देत होते. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना बंगलोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते मात्र आज सकाळीच त्यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली. आज ७ मे रोजी सकाळीच त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे समोर आले आहे. मोहन जुनेजा यांच्या जाण्याने दाक्षिणात्य सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

हजार करोडोंचा टप्पा गाठलेल्या KGF2 या चित्रपटाचा ते एक महत्वाचा भाग बनले होते तर KGF या चित्रपटाच्या पहिल्या च्यापटरमध्येही ते पाहायला मिळाले होते. या चित्रपटात त्यांचा एक डायलॉग होता जो खूपच लोकप्रिय झाला होता. ‘गॅंग लेकर आने वाले होते है गँगस्टर्स, वो अकेला आता था मॉंस्टर’… मोहन जुनेजा यांनी कॉलेजमध्ये असल्या पासूनच नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. तमिळ, तेलगू, मल्याळम तसेच हिंदी भाषिक चित्रपटात ते झळकले होते. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत विनोदी अभिनेते अशी त्यांची ओळख होती. पारु आय लव्ह यु, युवा सम्राट, कट्टू कथे, रहाती, अक्का पक्का, टोपीवाला अशा जवळपास १०० हुन अधिक चित्रपटात त्यांना अभिनयाची संधी मिळाली होती. चेलता या चित्रपटामुळे मोहन जुनेजा यांना लोकप्रियता मिळाली होती. चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले होते. २००८ साली संगमा या कन्नड चित्रपटात त्यांना मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती.

चित्रपट तसेच काही मालिकांमधून ही त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना हसवले होते. वतारा ही त्यांनी अभिनित केलेली मालिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात आहे . KGF आणि KGF2 या दोन्ही सुपरहिट चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली होती. आपल्या कारकिर्दीत मोठमोठ्या कलाकारांसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती. आज त्यांच्या निधनाच्या बातमीने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी मोहन जुनेजा यांना त्यांच्याप्रती भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आमच्या संपूर्ण टीमकडून अभिनेते मोहन जुनेजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली… ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच इच्छा.