मराठी बिग बॉसची स्पर्धक स्नेहा वाघ आपल्या आयुष्यात दोनदा घटस्फोट झाल्यानंतर प्रेक्षकांकडून सहानुभूती मिळवताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात स्नेहा वाघ आणि तिचा पहिला पती अविष्कार दारव्हेकर हे याच कारणामुळे चर्चेत येत आहेत. अविष्कारने बिग बॉसच्या घरात राहून एक कविता स्पर्धकांना ऐकवली होती ती कविता स्नेहा वाघ च्या आयुष्याशी मिळतीजुळती होती. त्यामुळे अविष्कार आणि स्नेहा पूर्वीचे वाद विसरून नव्याने मैत्रीपूर्ण संबंध बनवताना दिसतील का? हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित होत आहे.

स्नेहा वाघने घरगुती हिंसाचार प्रकरणी अभिनेता अविष्कार दारव्हेकर याला घटस्फोट दिला होता. २०१५ साली तिने इंटेरिअर डिझायनर असलेल्या अनुराग सोळंकी सोबत दुसरा विवाह केला मात्र अनुरागच्या त्रासाला कंटाळून अवघ्या ८ महिन्यातच तिने त्याच्यापासून घटस्फोट घेण्याचे ठरवले. हिंदी मालिका अभिनेत्री काम्या पंजाबी हिने स्नेहा वाघला याबाबत आता चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून तिने स्नेहा वाघ वर आरोप लावले आहेत की, ‘ तुला बिग बॉसच्या घरात यायचं होतं ही चांगली गोष्ट आहे…परंतु तू वीक्टीम कार्ड कशाला खेळतेस?…तुझ्या पहिल्या लग्नाबद्दल मला फारशी काही कल्पना नाही मात्र तू दुसऱ्या लग्नाच्या काहीही कहाण्या सांगू नकोस, तेही ह्या ४ दिवसाच्या शोसाठी …तुला चांगलंच माहितीये मी सत्य बाहेर आणू शकते… असा वाईट खेळ खेळू नकोस.’ काम्या पंजाबी हिने स्नेहा वाघवर लावलेल्या आरोपावर स्नेहाचा दुसरा पती अनुराग सोळंकी यानेही ट्विटरवरून एक प्रतिक्रिया दिली आहे.

त्याची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. अनुराग सोळंकी काम्याचे आभार मानत म्हणतो की, ‘ धन्यवाद काम्या! मला मोठा धक्का बसला आहे की ह्या शोमध्ये येण्यासाठी लोकं कुठल्याही ठरला जाऊ शकतात. मला यावर काहीही म्हणायचं नाही पण स्नेहा तुला एक विनंती आहे की जेव्हा तू बिग बॉसच्या घरातून बाहेर निघशील तेव्हा मी तुझा कधी छळ केला आहे का याचा मला एक तरी पुरावा दे’ . अनुराग सोळंकी याने स्वतः हे ट्विट करताच प्रेक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झालेले पाहायला मिळत आहे. स्नेहाचे म्हणणे बरोबर की अनुरागचे म्हणणे बरोबर हे त्यांचं त्यांनाच ठाऊक मात्र काम्या पंजाबी यावर अधिक काय खुलासा करू शकते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.