सोशलमीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल आणि कधी कोणत्या व्हिडिओला लाखो लाइक्स, मिलियन्स व्ह्यूज मिळतील हे काही सांगता येत नाही. थोडक्यात काय तर सोशल मीडिया हे माध्यम जरी प्रत्येकाच्या हातात असलं तरी त्यावर स्टार होण्याची प्रत्येकालाच मिळते असं नाही. सध्या सोशलमीडियावर इन्स्टाग्राम ओपन करताच एक शीला नावाची कामवाली बाई दिसते. कामवालीच्या रूपात मजेशीर व्हिडिओ बनवून ती सोशलमीडियावर हिरोइन झाली आहे. कोण आहे ही कामवाली बाई आणि आज सोशलमीडियावर हिट घेणारी ही शीला नेमकी काय काय करते हे जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत.

हिरव्या रंगाची साडी, स्लीव्हलेस ब्लाउज, कुरळ्या केसांचा आंबाडा असा तुमच्या आमच्या घरातील कामवाली बाईचा लूक असलेली शीला म्हणजे पुण्याची अपर्णा तांदळे. आज जरी अपर्णाच्या एका व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या उड्या पडत असल्या तरी इथपर्यंत पोहोचण्यासाठी अपर्णाने खूप मेहनत घेतली आहे. जेव्हा टिकटॉकची क्रेझ होती तेव्हापासून अपर्णाला व्हिडिओ बनवण्याची आवड लागली. सुरूवातीला अपर्णाने तिच्या आईसोबत काही व्हिडिओ बनवले तर त्याआधी तिने टिकटॉकवर अभिनयाची कमाल दाखवली. घराघरात कामवाली बाई आणि मालकीण यांच्यातील मजेदार संवाद होतच असतात. शिवाय कामवाली बाई हा प्रत्येक गृहिणीसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. याच वन लाइन स्टोरीवर अपर्णाला या कल्पनेवर व्हिडिओ बनवण्याची नस सापडली. आता इन्स्टावर अपर्णा साकारत असलेल्या कामवाली शीला या पात्राला खूपच प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडिओमध्ये सायली सोनुले आणि अभिजित कुलकर्णी हे अपर्णाचे सहकलाकार आहेत ज्यांनी घरमालकीण व घरमालक यांच्या भूमिका केल्या आहेत.

आयपीएल तिकीट, पगारवाढ, घरमालकाला ऑफीस सहकारी मैत्रीणीचा येणारा फोन हे अपर्णाचे व्हिडियो खूपच गाजले. अपर्णा पुण्याची असून तिने शाळा, कॉलेजमध्ये असताना नाटकात काम केलं आहे. शिवाय ती फॅशन शोमध्ये मॉडेलिंगही करते. डान्ससाठी ती वेडी असून तिचे डान्सचे व्हिडिओही खूपच लोकप्रिय आहेत. ती एक उत्तम डान्सर असल्याचे दिसून येते. आई वडील आणि दोन बहिणी अशा कुटुंबात राहणारी ही पक्की पुणेकर अपर्णा सध्या ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. अपर्णाला फक्त आणि फक्त अभिनेत्रीच व्हायचं आहे. त्याची सुरूवात अपर्णाने सोशलमीडियावरील रिल्स, व्हिडिओ बनवून केली असली तरी तिचे अभिनेत्री होण्याचे स्वप्न आहे. खूपच कमी दिवसात सोशल मीडियावर लाखो चाहते बनवणारी मराठमोळ्या अपर्णा तांदळे हिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा….