एका रात्रीत स्टार होणे म्हणजे काय असते याचा अनुभव आजपर्यंत अनेकांना आला आहे. पण गेल्या काही वर्षात सोशलमीडियाने टिपलेल्या सर्वसामान्य कलाकारांना करोडो लोकांपर्यंत पोहोचवण्याची कमाल केली आहे. सध्या इन्स्टापेज ओपन करताच भुवन बदायकर हे नाव आणि त्याचे कच्चा बदाम हे गाणे फक्त झळकतच नाही तर त्यावर लाखो रिल्स आणि व्हिडिओ बनले आहेत. पण जसा एखादं अपयश स्वीकारता आलं पाहिजे हे खरं आहे तितकच यशही साजरं करता आलं पाहिजे असं म्हणतात. गेल्या महिन्याभरात देशातच नव्हे तर जगातील सात देशांमध्ये लोकप्रिय झालेल्या भुवन या ब्ं गालच्या शेगदाणा विक्रेत्याला नेमकी यशाची नशा चढली आणि त्याने केलेल्या विधानाने यशाची कमान कधीही कोसळेल की काय असे चित्र दिसू लागले आहे.

गेली दहा वर्षे रोज सायकलवरून फिरत शेंगदाणे विकून दिवसाकाठी अडीचशे रूपये मिळवणारया भुवनला गाणे म्हणत शेंगदाणे विकायची सवय होती. पश्चिम ब्ंगालमधील बीडहूम जिल्हय़ातील पुरालजुरी गावात बायको आणि तीन मुलांसोबत भुवन एका मातीच्या घरात राहतो. शेंगदाणे विक्री हाच त्याचा व्यवसाय आहे. ब्ंगालमध्ये शेंगदाण्यांना कच्चा बदाम म्हणतात. पोत्यातील कच्चा बदामाचे वर्णन करणारे एक पारंपरिक भाषेतील गाणे त्याने रचले आणि ते त्याच्या शैलीत म्हणत तो कच्चा बदाम विकत फिरायचा. त्याचे गाणे एका पर्यटकाने सोशलमीडियावर चित्रीत केले आणि पोस्ट केले. भुवनच्या प्रसिध्दीचा हाच टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर एका म्युझिक कंपनीने त्याच्या गाण्यावर रिमिक्स केले ज्यामध्ये भुवनही स्क्रिनवर दिसला. दरम्यान सगळीकडे त्याच्या गाण्याची चलती सुरू झाली पण त्याला काहीच पैसे मिळाले नाहीत. ही गोष्टही त्याने सोशलमीडियावर व्हायरल केली तेव्हा त्या म्युझिक कंपनीने त्याला दीड लाखांचा पहिला चेकही दिला. इतकंच नाही तर आणखीन अनेक म्युजिक कंपनींकडून त्याला अनेक ऑफर आल्या आहेत.

सगळं कसं छान सुरू होतं पण माशी शिंकली ती भुवनने केलेल्या एका विधानाने. भुवन असं काय म्हणाला की त्याच्या गाण्यावर थिरकणारया प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या. भुवनची मुलाखत घेण्यासाठी आलेल्या एका वाहिनीला प्रतिक्रिया देताना भुवन म्हणाला की, आता मी सेलिब्रिटी झालो आहे. आता मी शेंगदाणे विकणे माझ्यासाठी अपमानास्पद आहे. मला आता मोठा कलाकार व्हायचे आहे. माझे गावकरी असं म्हणत आहेत की मला आता खूप लोक ओळखतात, त्यामुळे मी शेंगदाणे विकण्यासाठी बाहेर पडणे योग्य नाही. मला कुणीतरी किडनॅप करेल. आता भुवनच्या डोक्यात हे यश गेले आहे असे त्याच्या गाण्याचे फॉलोअर्स म्हणत आहेत. ज्या शेंगदाण्यांना म्हणजेच ब्ंगाली भाषेत सांगायचे तर कच्चा बदामांनी भुवनला रस्त्यावरून प्रसिध्दीच्या आकाशात पोहोचवलं तो व्यवसायच आता कमीपणाचा वाटल्याने थांबवणार असल्याचे भुवनचे म्हणणे त्याच्या चाहत्यांना बुचकळय़ात टाकत आहे. यापूर्वीही राणू मंडल या रस्त्यावर गाणे म्हणून भीक मागणारया महिलेला सोशलमीडियाने रातोरात स्टार बनवले. हिमेश रेशमियाने तिच्याकडून गाणेही म्हणून घेतले. पण चटकन मिळालेल्या यशाने हुरळून जात राणू मंडल पुन्हा रस्त्यावर आली. ही वेळ भुवनवर येऊ नये असे त्याच्या गाण्याच्या चाहत्यांना मनापासून वाटत आहे.