ज्येष्ठ गायिका आणि नाट्य अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या ७० व्या वर्षी आज शनिवारी पहाटे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून कीर्ती शिलेदार यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. जवळपास सहा दशके मराठी संगीत रंगभूमीची निस्सीम सेवा करणाऱ्या कीर्ती शिलेदार यांच्या निधनाच्या बातमीने मोठी पोकळी निर्माण झालेली पाहायला मिळते आहे. मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि गायिका जयराम शिलेदार आणि जयमाला शिलेदार यांच्या त्या कन्या होत्या. गायिका लता शिलेदार (दीप्ती भागवत) या त्यांच्या भगिनी. कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या १० व्या वर्षापासूनच रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली होती.

आई वडील दोघेही संगीत नाट्य प्रेमी त्यामुळे त्यांची नाटकं बघता बघता नाटकातील संवाद आणि पदं मुलांच्या अगदी तोंडपाठ असायची. घरी आल्यावर त्याचे तालासुरात नकला आणि विडंबन चालायचे यातून आई वडिलांना कळून चुकले की आपल्या मुलांनाही संगीत विषयाची आवड आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कीर्ती आणि लता शिलेदार यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले पुढे. कीर्ती शिलेदार यांनी संगीताचे उच्च शिक्षण नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडून घेतले होते. कीर्ती शिलेदार यांच्या गोड आवाजातली अनेक गीतं प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. नाटकातील त्यांच्या भूमिका अभ्यासपूर्ण होत्या त्यामुळे त्यांच्या सर्व भूमिका आगळ्यावेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या होत्या. मंदोदरी, मानापमान, रंगात रंगला श्रीरंग, शाकुंतल, शारदा, संगीत एकच प्याला, अभोगी , द्रौपदी, मृच्छकटिक, ययाती आणि देवयानी अशी अनेक नाटकं त्यांनी आपल्या अभिनयाने आणि सुमधुर गळ्याने गाजवली होती. ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. संगीत स्वरसम्राज्ञी हे त्यांचं अत्यंत गाजलेलं नाटक होतं. कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार या तिघानि मिळून तीन पात्री सौभद्र सादर केलं होतं या नाटकाचे अनेक प्रयोग झाले होते. संगीत नाटकाला आपला श्वास मानणाऱ्या ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!