
कलर्स मराठी वाहिनीवर जीव झाला येडा पिसा ही मालिका प्रसारित केली जात होती. गेल्याच महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेच्या कलाकारांना प्रेक्षक विसरलेले नाहीत. साधारण गेल्या दोन वर्षात या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते त्यामुळे या कलाकारांचे एकमेकांशी घट्ट नाते बनले होते. मात्र नुकतेच या मालिकेतील कलाकाराचे दुःखद निधन झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वच कलाकार भावुक झाले आहेत. मालिकेतील भावे म्हणजेच अभिनेते “हेमंत जोशी” यांनी दोन दिवसांपूर्वी या जगाचा निरोप घेतला आहे.

जीव झाला येडा पिसा मालिकेतून ते प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. त्यांना हेमंत जोशी नावाने कमी आणि मालिकेतील ‘भावे’ नावानेच जास्त ओळखले जायचे. हेमंत जोशी हे गेल्या २० वर्षाहून अधिक काळापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिकेच्या माध्यमातून ते सतत प्रेक्षकांसमोर येत राहिले आहेत. झी मराठीच्या रात्रीस खेळ चाले मालिकेतून त्यांनी काम केले होते शिवाय नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, टेंडल्या, बालगंधर्व अशा गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. हेमंत जोशी यांच्या जवळच्या एका मित्राने मीडियाशी बोलताना सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून हेमंत जोशी यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता शिवाय ऑक्सिजन लेव्हल देखील कमी झाली होती त्यामुळे त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी त्यांचे उपचार सुरू असतानाच निधन झाले. त्यांच्या अशा जाण्याने मालिकेच्या कलाकारांनी खंत व्यक्त करून त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. सतत हसमुख व्यक्तिमत्व, एव्हरग्रीन पर्सनॅलिटी अशा शब्दात अभिनेत्री सुमेधा दातार हिने त्यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तर सुप्रीत निकम या कलाकाराने जळगाव ते सांगली दरम्यानच्या प्रवासात त्यांच्यासोबतचा किस्सा सांगितला सुप्रीत म्हणतो की,काय लिहू आणि कसं लिहू सुचेना.. हेमंत काका नुकताच “जीव झाला येडपिसा” मधून तुम्ही घराघरात पोहोचला होता. लोक तुम्हाला जोशी कमी आणि जीव झाला मधले भावे म्हणून ओळखायला लागले होते. तुमच्या किती आठवणी सांगू तितकं कमी आहे. मला आठवतो तो जळगाव ते सांगलीचा लांबचा प्रवास. त्या प्रवासात तुम्ही माझ्या सोबत नसता तर कदाचित डिप्रेशन मध्ये गेलो असतो मी. एकाच सिनेमात काम करताना एका निर्मात्याने माझे पैसे बुडवल्याने प्रचंड निराश आणि खचलेला मी आणि मला सावरणारे आणि धीर देणारे तुम्ही. तुमचं ते वाक्य कायमच लक्षात राहील “तुझे ७० हजार बुडाले पण ७० लाखांचा अनुभव घेतलास तू, स्वामी असा अनुभव प्रत्येकाला देत नसतात, डोकं शांत ठेव आणि ऐश कर” आज तुमच्या रूपाने मी माझा एक मित्र हो मित्रच गमावला. कारण वडीलधारी असूनही तुम्ही जवळच्या मित्रा पेक्षा कमी न्हवता. काका तुम्ही नेहमी तक्रार करायचात की मी फोन करत नाही.. आता कुणाला फोन करू..? शेवटचा भेटायचं ही राहून गेलं हेमंत काका. भावपूर्ण श्रद्धांजली…