हृदय जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो असं म्हणतात. आणि हे अगदी खरंही आहे. प्रत्येकजण चवदार जेवणासाठी भुकेला असतो. जे आपल्या घरी राहत असतात त्यांच्यासाठी ही तृप्तीची ढेकर रोज मिळत असते. पण जे कामानिमित्ताने भटकंती करत असतात, नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या घरापासून लांब राहत असतात, आईच्या, बायकोच्या हाताची चव मिस करत असतात त्यांच्यासाठी तर घरच्या जेवणाचं महत्त्व अधिक असतं. अशाच घराघरातील मराठमोळ्या चवीला जागतिक स्थान मिळवून देण्याचा व्रत घेतलेल्या जयंती काठाळे यांनी त्यांच्या पूर्णब्रम्हचं एक पाऊल पुढं टाकलं आहे.

आता पूर्णब्रम्हच्या सात्विक आणि चवदार जेवणाची चव पुण्यातील खराडीकारांना मिळणार आहे. जयंती काठाळे हे नाव खवय्यांना आता चांगलच परिचयाचं झालं आहे. १३ वर्षे आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या, गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या जयंती काठाळे यांना जेव्हा विमानप्रवासात मराठमोळा वडापाव मिळाला नाही तेव्हा त्यांच्यातील मराठी सुगरणीने उचल खाल्ली. आयटी कंपनीतील नोकरी सोडून पूर्णब्रम्ह नावाची हॉटेलची मुहूर्तमेढ रोवली. आज त्यांच्या पूर्णब्रम्हच्या जगभरात शाखा आहेत. महत्त्वाचं म्हणजे पूर्णब्रम्हच्या प्रत्येक शाखेत अगदी आपल्या आजी, आई यांच्या काळातील मराठी पदार्थ मिळतात. पुण्यात कामाच्या, नोकरीच्या निमित्ताने एकटे राहणाऱ्या युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय काही कारणाने ज्यांना चांगल्या जेवणाचा डबा हवा असतो अशा पुणेकरांकडूनही पूर्णब्रम्हची टीफिन सेवा दिली जाते. पुण्यात ३ ठिकाणी म्हणजे बिबवेवाडी, बाणेर आणि खंडाळा या ठिकाणी यांच्या पूर्णब्रम्ह किचनची सेवा होती, आता पुण्यातील खराडी परिसरात पूर्णब्रम्हच्या नव्या शाखेला सुरूवात झाली आहे. ७ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही शाखा खवय्यांच्या सेवेत दाखल होणार आहे. पूर्णब्रम्ह किचनच्या व्यवस्थापकीय संचालक जयंत काठाळे यांनी त्यांच्या इन्स्टापेजस्टोरीवर ही आनंदाची बातमी दिल्याने त्यांच्या पदार्थांची चव घेण्यासाठी खराडीकर आतूर झाले आहेत.

जयंती काठाळे यांनी जेव्हा २०१२ साली पूर्णब्रम्ह किचन हॉटेल सुरू केले तेव्हा २० टेबल बसतील इतकीच जागा होती. आज त्यांच्या पूर्णब्रम्हचा विस्तार खूप् वाढला आहे. नोकरी व्यवसायाच्यानिमित्ताने घरापासून लांब राहणाऱ्यांना बाहेरच्या जेवणाचे अनेकदा तोटे सहन करावे लागतात. पण पूर्णब्रम्ह किचनने अनेकांची सोय झाली. जयंती काठाळे यांना जगभरात शाखाविस्तार करायचा आहे हे त्या नेहमी सांगतात. पुण्यात ३ ठिकाणी म्हणजे बिबवेवाडी, बाणेर आणि खंडाळा गजबजलेल्या भागात पूर्णब्रम्ह किचनमध्ये रोज सात्विक जेवण बनत होतच, आता एक पाऊल पुढे टाकत खराडी या भागात पूर्णब्रम्हचे सुग्रास ताट वाढले जाणार आहे. किचन कल्लाकर मध्ये देखील त्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. ह्या कार्यक्रमामुळे त्यांना आणखीन प्रसिद्धी मिळाली हे वेगळं सांगायची गरज नाही.