
जय जय स्वामी समर्थ या लोकप्रिय मालिकेतील सुमुखचे पात्र रंगवणाऱ्या कलाकाराचा रविवारी २१ नोव्हेंबर २०२१ रोजी विवाह सोहळा पार पडला आहे. मालिकेत सुमुख हे पात्र विरोधी भूमिका दर्शवत आहे मात्र ही विरोधी भूमिका दर्शवत असताना स्वतःचीच फसगत कशी होते हे पाहणे रंजक ठरते. अर्थात ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात वठवली आहे अभिनेता अनुज ठाकरे याने. अनुज ठाकरे आणि अश्विनी गोरले यांचा काल विवाह संपन्न झाला आहे. अनुजची पत्नी अश्विनी ही देखील नाट्य अभिनेत्री आहे. दिल्लीतील नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामधून तिने अभिनयाचे शिक्षण घेतले आहे.

अनुज आणि अश्विनीच्या या लग्नाला जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील कलाकारांनी देखील उपस्थिती दर्शवली होती. चंदाची भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर, जान्हवी किल्लेकर, पूजा रायबागी तसेच चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवे यांनी अनुजच्या लग्नाला हजेरी लावून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नाच्या दिवशी विजया बाबर हिने अनुजच्या लग्नाला नागपूरला जात असल्याची पोस्ट शेअर केली होती. अनुज ठाकरे हा विदर्भातील चांदुर रेल्वे या गावचा आहे.मालिकेत त्याने वठवलेला विनोदी खलनायक खूपच लोकप्रिय ठरला असला तरी हे यश त्याला सहजासहजी मिळालेलं नाही त्यामागे त्याची मेहनत खूप महत्त्वाची म्हणावी लागेल. कारण अभिनय क्षेत्रात येण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अनुजने मुंबईत येऊन पैशाअभावी अनेक खस्ता खाल्ल्या आहेत. शाळेत असताना अनुज बालनाट्यातून काम करत असे. अमरावती, अकोला, नागपूर अशा ठिकाणच्या नाट्यस्पर्धांमधून त्याने अनेक बक्षिसं जिंकली होती. सुरुवातीपासूनच अभिनयाची ओढ असल्याने नाट्यशास्त्रविषयातून त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर मुंबई गाठली. ओळखीच्या दोन तीन मित्रांसोबत रुम शेअर करून तो तिथे राहू लागला.

एक हरियानाचा रूम पार्टनर होता हातात पैसे नसायचे तेव्हा तोच मित्र मॅगी आणून द्यायचा ती मॅगी खाऊन संपूर्ण दिवस काढायचा. कित्येकदा अंधेरी ते गोरेगाव हा प्रवास पायीच करावा लागायचा. यातूनच पुढे नाटकांच्या म्युजिक ऑपरेटिंग करण्याचे काम मिळाले. त्यानंतर रत्नाकर जगताप यांच्या रंगमंच कामगार संघाच्या बॅनरखाली बॅकस्टेजच्या मुलांना एकत्रित घेऊन एकांकिका केली. यातूनच पुढे राज्यनाट्य स्पर्धा आणि एकांकिका स्पर्धा करण्याची संधी मिळाली. या स्पर्धा गाजवत असताना स्टार प्रवाहवरील एक नंबर ही मालिका मिळाली. क्राईम पेट्रोल, फ्रेशर्स, बे दुणे चार , हास्यरंग तसेच ५ हजार स्पर्धकांमधून ४ जणांची कॉमेडीची बुलेट ट्रेन साठी निवड करण्यात आली त्यात अनुजची वर्णी लागली. यशाचा हा प्रवास अनुभवत असताना जय जय स्वामी समर्थ मालिकेत सुमुख ही लक्षवेधी भूमिका मिळाली. या भूमिकेमुळे अनुज प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला.