“अमाप खुश झालो… नेत्रा आई आणि मी बाप झालो…” असे म्हणत अभिनेता आनंद प्रभू याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आनंद प्रभू हा नाट्य, मालिका अभिनेता आहे. तो मूळचा यवतमाळचा असून संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी येथून त्याने पदवीचे शिक्षण घेतले आहे. अभिनयाची आवड असल्याने त्याने मुंबईला येऊन थेटर आर्टस् जॉईन केले. इथूनच अनेक नाटकांतून अभिनयाची संधी त्याला मिळत गेली. झी युवावरील बापमाणुस या लोकप्रिय मालिकेत त्याला महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेतून नम्रता संभेराव हिच्यासोबत जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना देखील खूपच भावली होती.

सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत तो विरोधी भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्याने साकारलेली दाजीबा सरकारची भूमिका तितकीच भाव खाऊन जाताना दिसत आहे. बुवाला संपवण्यासाठी हा दाजीबा कुठल्या कुठल्या थराला जातो आणि कुठले कुठले डावपेच आखतो हे प्रेक्षकांना या मालिकेतून पाहायला मिळत आहे. त्याने साकारलेल्या या भूमिकेचा प्रेक्षकांना देखील प्रचंड राग येतो हीच आनंदच्या अभिनयाची पावती म्हणावी लागेल. अभिनेता आनंद प्रभूची पत्नी नेत्रा केतकर ही देखील कला क्षेत्राशी निगडित आहे. नेत्रा केतकर ही मूळची नाशिकची. मात्र तिने आपले पदवीचे शिक्षण पुणे युनिव्हर्सिटीमधून घेतले आहे. नेत्रा ही एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे. अनेक मंचावरून तिने आपल्या नृत्याचे सादरीकरण केले आहे. “कृष्ण प्रिया” संत मीराबाई यांच्या जीवनावर महा नृत्य नाटिका आयोजित करण्यात आली होती त्यात नेत्राने संत मीराबाई साकारली होती. नेत्रा आणि आनंद हे दोघेही नुकतेच आई बाबा झाले आहेत. १ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांच्या घरी चिमुरड्याचे आगमन झाले आहे. याबद्दल आनंद आणि नेत्रा दोघांचेही अभिनंदन…