आजकाल रस्ता केला की त्याची महिनाभरात चाळण होते. पूल बांधला की तो किती दिवस तरेल याचा नेम नसतो. बहुमजली इमारत कधी कोसळेल हे सांगता येत नाही. सार्वजनिक बांधकामाची ही अशी दयनीय अवस्था आहे की रस्ते सुरक्षा हा ऐरणीचा प्रश्न होऊन बसला आहे. पण आजपासून ४६ वर्षापूर्वी तयार केलेला एक रस्ता आजही जशाच्या तसा सुस्थितीत आहे. या रस्त्यावर गेल्या साडेचारदशकात एकही खड्डा पडलेला नाही. रस्ता जर दहा वर्षात खराब झाला तर पुन्हा स्वखर्चाने बांधून देईन इतक्या विश्वासाने ठेकेदार कंपनीने या रस्त्याच्या सुस्थितीची खात्री प्रशासनाला दिली होती. दहाच नव्हे तर ४६ वर्षे हा रस्ता खड्डेमुक्त बनून भ्रष्टाचारमुक्त कामाची पावतीच देत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, की हा रस्ता नेमका आहे तरी कुठे? आणि कोणत्या ठेकेदार कंपनीने हा रस्ता बनवला? या प्रश्नाचं उत्तर मिळतं ते थेट पुण्यातील जंगली महाराज रोडवर.

पुणे तिथे काय उणे असं म्हणतात. इतर बाबतीत आता परिस्थिती बदलली असेल पण जंगली महाराज रस्ता पाहिला आणि राज्यातील रस्तेअवस्थेचा पट डोळ्यासमोर आणला तर पुणे तिथे काय उणे या वाक्याची प्रचिती नक्कीच येईल. अडीच किलोमीटरचा हा जंगली महाराज रस्ता म्हणजे एकही खड्डा नसलेला सुरक्षित मार्ग आहे. ४६ पावसाळे, ऊन, वारा, वाहनांची ये-जा झेलून आजही उत्तम आहे. हे कसं घडलं हा प्रश्नही आता तुमच्या मनात डोकावला असेलच ना? साहजिकच आहे. कारण आज कोणत्याही शहरातील रस्ते म्हणजे खड्डेमय झाले आहेत. चार दिवस पाऊस पडला की रस्त्यांमध्ये डबकी साठतात. छोटेमोठे अपघात होतात. डांबर वाहून जातं आणि खडी बाहेर येते. त्यात मांडव घालण्यासाठी रस्ते खोदले की त्यांचं आयुष्य कमी होतं ते वेगळच. नेमक्या याच गोष्टी करायच्या नाहीत ही अट घालूनच पुण्यातील जंगली महाराज रस्ता करण्याचं कंत्राट मुंबईच्या रेकाँडो या ठेकेदार कंपनीने घेतलं होतं. आज ४६ वर्षानंतरही या रस्त्यावर साधी भेगही नाही याचं कारण कंपनीने घातलेल्या अटींमध्येच आहे. १९७२ साली दुष्काळ पडला होता, आणि त्यानंतर पुढच्याचवर्षी १९७३ ला तुफान पाऊस आला. त्या पावसात याच जंगली महाराज रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती. खड्डा कुठे आणि रस्ता कुठे हे शोधण्याची वेळ पुणेकरांवर आली होती. वाहनं चालवणं तर सोडाच पण पायी चालणंही धोक्याचं बनलं होतं. त्यावेळी पुणे महापालिकेचे स्थायी समिती सभापती होते श्रीकांत शिरोळे. त्या वर्षी जंगली महाराज रस्ताच्या अवस्थेचा पाढा सभागृहात गाजला होता. शिरोळे यांना प्रश्न पडला की मुंबईतील रस्ते कसे चांगले राहतात.

इतर शहरातील काही रस्तेही खड्डेमुक्त असतात, मग जंगली महाराज रस्ताही टिकावू का होऊ शकणार नाही? मुसळधार पावसामुळे जंगलीमहाराज रस्ता वाहून गेल्याचा मुद्दा खोडून काढत श्रीकांत शिरोळे यांनी या रस्त्याच्या दुरवस्थेला पाऊस नव्हे तर रस्तेबांधणीत होणारा गैरव्यवहार, टक्केवारी हे कारणीभूत असल्याचं ठाम मत मांडलं. त्यानंतर शिरोळे यांनी या रस्त्याच्या कायापालट करण्याचा जणू चंगच बांधला आणि आज जो रस्ता दिसतोय त्याचं मूळ शिरोळे याच्या पाठपुराव्यातच आहे. ७० च्या दशकात मुंबईचे रस्ते खूपच चांगले होते. कार्यालयीन कामासाठी वारंवार मुंबईला जाणाऱ्या शिरोळे याच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. मुंबईतील रस्ते करण्याचं काम ज्या ठेकेदार कंपनीकडे आहे त्या रेकॉन्डो कंपनीची त्यांनी माहिती काढली. ती कंपनी होती दोन पारशी मित्रांची. पनवेलला जाऊन त्यांनी कंपनीच्या ठेकेदारांची भेट घेतली. त्या भेटीत पुण्यातील जंगली महाराज रस्त्याच्या अडीच किलोमीटरच्या कामाची माहिती दिली. कंपनीच्या ठेकेदारांनी रस्ते कामाचं कंत्राट स्वीकारले आणि दहा लाख अपेक्षित खर्च सांगितला. प्रत्यक्षात या कामासाठी १५ लाख रूपये खर्च आला. १९७६ च्या १ जानेवारीला या रस्त्याचं काम पूर्ण झालं.रस्ता पूर्ण झाल्यानंतर कामाचे पैसे हातात घेताना त्या कंपनीच्या पारशी मालकांनी पुणे महापालिका प्रशासनाला दोन अटी घातल्या. एक म्हणजे या रस्त्यावर मांडव घालण्याची परवानगी द्यायची नाही आणि दुसरी अट म्हणजे या रस्त्यावर एकही खिळा ठोकायचा नाही. या दोन्ही अटी पुणे महापालिकेने मान्य केल्या आणि जंगली महाराज रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला. आजही या रस्त्यावर दोन्ही अटींबाबत तडजोड केली जात नाही. १९८५ पर्यंत या रस्त्याला काहीही होणार नाही असं कंपनीने लिहून दिलं होतं. २०१३ साली या रस्त्यालगत काही डागडुजी करण्यात आली. ती वगळता मुख्य रस्ता ४६ वर्ष खड्डेमुक्त राहण्याची किमया दर्जेदार रस्तेबांधणी आणि भ्रष्टाचार टक्केवारीमुक्त व्यवहार यामुळेच झाली.