येत्या काही दिवसात झी मराठी वाहिनीवरील बऱ्याचशा मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. त्यात मन उडू उडू झालं ही लोकप्रिय मालिका देखील लवकरच एक्झिट घेणार आहे. खरं तर मन उडू उडू झालं या मालिकेला चांगला टीआरपी मिळाला होता. झी मराठी वाहिनीवरची ही नंबर २ ची मालिका टीआरपी च्या स्पर्धेत प्रथम १० च्या यादीत नाव नोंदवताना दिसली होती. इंद्रा आणि दिपूची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसली. मात्र चित्रपटाच्या व्यस्त शेड्युल मुळे हृताला टाईम ऍडजस्ट हिट नव्हता. याच कारणास्तव मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मालिकेचा शेवट इंद्रजित आणि दीपिका च्या लग्नाने होणार आहे.

बऱ्याच संघर्षानंतर देशपांडे सरांनी दोघांना लग्नाची परवानगी दिली आहे. गेल्या काही भागांपासून मालिकेत त्यांच्या लग्नाच्या खरेदीची लगबग पाहायला मिळाली. आता या दोघांचे लग्न मालिकेत धुमधडाक्यात पार पडणार आहे. नुकताच इंद्रजितचा नवरदेवाचा लूक समोर आला आहे. दाक्षिणात्य स्टाईल असलेल्या इंद्राच्या रॉयल लुकमुळे अजिंक्य राऊत भाव खाऊन जाताना दिसत आहे. तर लवकरच दीपिकाचा देखील नवरीचा लूक समोर आलेला पाहायला मिळणार आहे. मालिकेतील इतर कलाकार मंडळी अर्थात सानिका आणि कार्तिकने देखील इंद्रा आणि दीपिकाच्या लग्नात नटूनथटून हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. मालती आणि मनोहरराव हे देखील आपल्या लेकीच्या लग्नासाठी सज्ज झाले आहेत. दीपिकाचा लग्नातला रुखवत देखील मालिकेतून सजवलेला पाहायला मिळणार आहे. मन उडू उडू झालं या मालिकेच्या जागी येत्या काही दिवसात नवीन मालिका दाखल होत आहे. तू चाल पुढं’ ही नवी मालिका येत्या १५ ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार रात्री ७.३० वाजता झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. मन उडू उडू झालं या मालिकेतील कलाकारांनी नुकतेच मालिकेचे शूटिंग पूर्ण करून एकमेकांना निरोप दिला आहे.

इंद्रा आणि दिपूच्या लग्नाचे चित्रीकरण देखील पूर्ण करण्यात आले असून त्यांच्या लग्नाचा लूक आता समोर आलेला पाहायला मिळतो आहे. येत्या काही दिवसातच या मालिकेतून प्रेक्षकांना त्यांच्या लग्नाचा सोहळा पाहायला मिळणार आहे. तेव्हा या लग्नाची प्रतीक्षा तमाम चाहत्यांना लागून राहिली आहे. मालिकेचे शेवटचे काही भाग प्रेक्षकांची तुफान पसंती मिळवत आहेत त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मालिकेचा टीआरपी सुद्धा वाढला आहे. हृता दुर्गुळे सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या टाईमपास ३ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अनन्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला मालिकेतल्या सहकलाकारांनी हजेरी लावून तिला शुभेच्छा दिल्या होत्या. मालिका संपल्यानंतर हृता पुन्हा कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याचीही प्रेक्षक वाट पाहत आहेत.