
मालिकेचा टीआरपी टिकवायचा असेल तर ट्विस्ट आणावे लागतात. मन उडू उडू झालं या मालिकेतही असेच एकेक रंजक टप्पे येत आहेत. सानिकाच्या अफेयरपासून ते तिच्या लग्नापर्यंत या मालिकेत भरपूर ड्रामा होता. त्यानंतर दीपिका आणि इंद्रा यांच्या प्रेमाची खबर मालतीला लागल्यापासूनही मालिकेच्या प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. नुकताच या मालिकेत शलाकाचा सासरच्या मंडळीकडून होत असलेला त्रास उघड करण्यात आला. दीपू आणि इंद्रा शलाकाच्या सासरच्या मंडळींना कसा धडा शिकवतात पुढच्या काही ट्रॅकमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

देशपांडे सरांच्या तीन मुलींपैकी मोठ्या शलाकाच्या लग्नापासूनच स्नेहलता आणि नयन यांची पैशासाठीची हाव दाखवण्यात आली आहे. त्यांचा हा स्वभाव इंद्रा आणि दीपू यांच्या नजरेतून सुटत नाही. यापूर्वी भर मांडवातही दीपूने शलाकाची सासू स्नेहलताला सुनावलं होतं. पण आईबाबांना त्रास होऊ नये म्हणून शलाका तिला होत असलेल्या जाचाबद्दल सांगत नाही. पण नयनने घेतलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी शलाकाच्या घरी गेलेल्या दीपू, इंद्रा आणि सत्तूला काही वेगळच चित्र दिसतं. शलाकाच्या हाताला चटके देऊन तिचा छळ केला जात असतो. हे पाहून दीपू त्यांचा चांगलाच समाचार घेते. तर इंद्रा नयन आणि त्याच्या आईवडीलांना चोपतो. त्यानंतर ते शलाकाला घेऊन घरी येतात. सध्या ही मालिका या वळणावर आली आहे. घरी आल्यानंतरही मालती इंद्रावरच राग काढते, पण जेव्हा दीपू शलाकाची परिस्थिती आईला सांगते तेव्हा मात्र तिचे डोळे उघडतात. आता मालिकेत नयन आणि त्याचे आईबाबा यांना दीपू आणि इंद्रा मिळून कसे वठणीवर आणतात हे दाखवण्यात येणार आहे. शलाका सध्या गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या छळामुळे प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. तिला आधार देण्यासाठी दीपू महत्वाची भूमिका बजावू शकते. तसेच लाडक्या दीदीची ही अवस्था पाहून देशपांडे सरांनाही धक्का बसतो.

तेव्हा इंद्रा पुन्हा एकदा देशपांडे कुटुंबासोबत खंबीरपणे उभा राहू शकतो. मालिकेत येणारे हे ट्रॅक दीपू आणि इंद्रा यांच्या नात्याचा विरोध मावळण्यासाठी उपयोगी ठरू शकतील. अशा अनेक वळणांनी या मालिकेत पुढच्या काही भागात रंजक गोष्टी पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. पण ह्या भागापासून खूप काही शिकण्यासारखं आहे. मुलीला लग्न करून पाठवतेवरी त्यांच्या मागण्या नवनवीन वस्तू दाग दागिने आणि पैसे मागण्याची सवय ओळखून तरी मुलीच्या घरच्यांनी वेळीच योग्य निर्णय घायला पाहिजे जेणेकरून मुलीला पुढे होणारा त्रास तरी वाचेल मुलगी परदेशात जाईल तीच कल्याण होईल अश्या हेतून त्यांच्या मागण्या पुरवणे कितपत योग्य आहे हे खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ठ आहे. आता आपली मुलगी घरी आल्यावर देशपांडे सर काय निर्णय घेणार आणि पुढे काय पाऊल उचलणार याची उत्सुकता लागून आहे.