झी मराठी वाहिनीवर सध्या ‘हृदयी प्रीत जागते’ हि मालिका चांगलं यश संपादन करताना पाहायला मिळत आहे. मालिकेतील सर्वच कलाकार उत्तम अभिनय साकारताना पाहायला मिळतात. मालिकेत वीणा आणि प्रभास ह्यांची हटके लव्हस्टोरी पाहायला मिळतेय. वीणा हे पात्र अभिनेत्री पूजा कातुर्डे हिने साकारले आहे तर प्रभास सदावर्तेच्या भूमिकेत अभिनेता सिद्धार्थ खिरीड पाहायला मिळतोय. ह्या मालिकेत पूर्णिमा तळवलकर, राजू बावडेकर, दिपाली चौघुले, सचिन देशपांडे, हर्षल बराडे आणि पंकज विष्णू यांनी भूमिका साकारल्या आहेत. मालिकेत प्रभास सदावर्ते ह्याची आत्या शैलजा सदावर्ते हि पूर्वी वीणाच्या मामांच्या प्रेमात असतात. मात्र ह्या दोघांचे लग्न होऊ शकलं नाही असं दाखवण्यात आलं आहे.

वीणाचे मामा म्हणजेच अभिनेता पंकज विष्णू यांच्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. अभिनेता पंकज विष्णू यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी मालिका आणि चित्रपटात देखील उत्तम भूमिका साकारल्या आहेत. विनाकारण राजकारण, सूर्या,पैसा पैसा, युद्ध अश्या अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तर हरपूल मोहिनी, गुम है किसीके प्यार मै, तुझसे है रबता, CID अश्या अनेक हिंदी मालिका साकारल्या आहेत. मराठी पेक्षा त्यांना हिंदी मालिकांत जास्त ओळख मिळाली आहे पण सध्या सुरु असलेल्या हृदयी प्रीत जागते ह्या मालिकेतून ते पुन्हा मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अभिनेते पंकज विष्णू ह्यांनी सुमारे ३३ वर्षांपूर्वी सुपरहिट ठरलेल्या “गोट्या” ह्या मराठी मालिकेत देखील बालकलाकाराची भूमिका साकारली होती. होय गोट्या मालिकेत बालकलाकार म्हणून ३३ वर्षांपूर्वी अभिनेता पंकज विष्णू ह्यांनी देखील भूमिका साकारली होती. गोट्या ज्या हॉटेलमध्ये काम करत असतो त्या हॉटेलमध्ये कित्तेक वर्षांपासून तेही काम करत असत. शंकऱ्या, गण्या, रम्या आणि बाळ्या हे चार मुले त्याच हॉटेलमध्ये काम करत असतात. पण आपल्या नंतर ४ वर्षांनी कामाला आलेल्या गोट्या आपल्या मालकाचं मन जिंकतो आणि मालक गोट्यालाच चक्क गल्यावर बसवतो हे तेथे काम करत असलेल्या ह्या ४ जणांना अगदीच रुचत नाही आणि मग ह्यातला शंकर जो सर्वात मोठा असतो तो गोट्याला धाक दाखवतो आणि हे सगळे मिळून ते गोट्याची पिळवणूक करायला सुरवात करतात.

शंकऱ्या, गण्या, रम्या आणि बाळ्या हे सगळे मिळून गोट्याला चांगला चोप देखील देतात ह्या मुलांमध्ये गण्या म्हणजे अभिनेता पंकज विष्णू हे देखील पाहायला मिळाले. पुढे अभिनेता विजय कदम गोट्याला भांडणातून सोडवतात. विजय कदम ह्यांनी देखील दगडू एका दारुडा असलेल्या ट्रक ड्रॉयव्हरची भूमिका अगदी चोख बजावली होती. गोट्या मालिकेच्या ३ ऱ्या आणि ४ थ्या भागात तुम्हाला पंकज विष्णू पाहायला मिळतात. तेंव्हाचा त्यांचा लूक देखील आजच्या इतकाच स्मार्ट होता हे फोटो पाहून तुम्हालाही समजून येईलच. गोट्या म्हणजे अभिनेता जॉय घाणेकर आता परदेशात स्थायिक आहे. तर मालिकेतील बरेचसे कलाकार आजही चांगल्या भूमिका साकारताना पाहायला मिळतात त्यातील एक नाव म्हणजे अभिनेता पंकज विष्णू. असो अभिनेते पंकज विष्णू ह्यांना ‘हृदयी प्रीत जागते’ ह्या झी वाहिनीवरील मराठी मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा…