झी मराठी वाहिनीने होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे महामिनिस्टर या मोठ्या स्वरूपात बदल केला आहे. आजवर महाराष्ट्राच्या घरात जाऊन आदेश बांदेकर यांनी पैठणी देऊन गृहिणींना सन्मानित केले आहे. मात्र आता महामिनिस्टरच्या नव्या शो मध्ये वहिनींना आदेश भाऊजी तब्बल ११ लाखांची पैठणी देऊन हा सन्मान अधिक उंचावणार आहेत. ११ लाखांच्या पैठणीची घोषणा करताच सोशल मीडियावर मात्र काही जणांनी विरोध दर्शवलेला पाहायला मिळाला. एवढी मोठी रक्कम असलेली पैठणी देण्यापेक्षा आदेश भाऊजीनी त्या कुटुंबाला पैशाच्या स्वरूपात मदत करावी अशी विचारसरणी पुढे मांडण्यात आली. मात्र हा विरोध होत असताना आदेश बांदेकर यांनी या ११ लाखांच्या पैठणीबाबत एक खुलासा केला आहे. हा खुलासा करताना आदेश बांदेकर गहिवरून गेले होते शिवाय त्यांच्या डोळ्यांच्या कडा पणावल्या होत्या.

याचे स्पष्टीकरण देत असताना आदेश बांदेकर म्हणतात की, महाराष्ट्रातल्या माऊली रोज घरा घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात त्यांना एक दिवस आनंदाचा मिळाला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक क्षण हा त्यांच्या स्मरणात राहील अशा पद्धतीने आनंद देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. ५५०० घरांमध्ये होममिनिस्टरची ही यात्रा जाऊन पोहोचली आहे त्याला १८ वर्षे झाली. कित्येक लाख किलोमीटरचा प्रवास झाला आणि त्यावेळी ५५०० माऊलींचा महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ही संकल्पना पूर्णपणे झी मराठीची आहे मी निवेदकाच्याच भूमिकेत पहिल्यापासून आहे. त्यामुळे माझं आणि झी मराठीशी प्रत्येक कुटुंबाचं नातं जोडलं गेलं आहे. ११ लाखांच्या पैठणी बाबत झी मराठीची भावना स्वच्छ होती ही संकल्पना निलेश मयेकर याने मांडली त्याक्षणी का असू नये ११ लाखाची पैठणी?…ही भावना अधोरेखित केली होती. का तिच्या कपाटात ११ लाखांची पैठणी असू नये?…तिने आयुष्यभर स्वप्न बघितलं पैठणीचं पण ते बघत असताना एकीकडे हाच विचार झाला.पण दुसरीकडे काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. पण मला सांगायला अतिशय आनंद होईल की ती पैठणी कशी तयार होते हे बघायला आम्ही येवल्याला गेलो कापसे पैठणी आणि आम्ही थक्क झालो, शब्द नव्हते आमच्या डोळ्यात फक्त पाणी होतं आणि जे विणकर ती पैठणी विणत होते त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं.

कारण त्यांची भावना अशी होती की २००४ च्या दरम्यान हा कार्यक्रम सुरू झाला त्याच्या आधी सगळे विणकर हे आपापले लुम्स विकून नुकसान झाल्यामुळे कर्जबाजारी झाल्यामुळे गाव सोडत होते. आणि ज्या क्षणी होमिनिस्टर सुरू झालं त्यानंतर दिवसाला एक पैठणी जी विकली जायची ती कालांतराने दिवसाला शंभर पैठण्या सुरू झाल्या. त्यातून असंख्य विणकारांच्या हाताला काम मिळालं. ही भावना मी नाही तर तिथल्या विणकारांनी व्यक्त केली. या ११ लाखांच्या पैठणीला बघायला गेलो तेव्हा मी थक्क झालो कारण ही पैठणी ज्यांच्या हातातून विणली जाते ते विणकर कुटुंब आहेत नवरा बायको त्यांना बोलता येत नाही आणि त्यांना ऐकूही येत नाही. अशा विणकरांना जी मजुरी मिळणार आहे ती त्यांच्या कुटुंबाला मिळणार आहे याचा आनंद जास्त मोठा आहे. हे स्पष्टीकरण देत असताना आदेश भाऊजी मात्र पुरते गहिवरून गेले होते. महाराष्ट्राची ओळख असलेल्या पैठणीला खरी प्रसिद्धी मिळाली ती होमिनिस्टर या कार्यक्रमामुळे. त्यानंतर प्रत्येक गृहिणीला आपल्याकडे एकतरी पैठणी असायला हवी अशी ईच्छा वाटू लागली. महावस्त्र असलेल्या पैठणीचा थाट सणसमारंभात तितकाच खुलून दिसतो हे प्रत्येक गृहिणींला कळून चुकले. सोबतच विणकरांना देखील हाताला काम मिळाले. डबघाईला आलेले व्यवसाय आता दिवसेंदिवस अधिकच भरभराटीला आल्याचे श्रेय नक्कीच होमिनिस्टर या कार्यक्रमाला द्यायला हवे.