जरा हटके

राणादा पाठकबाईंचं लग्न पुण्यात लग्नाचा जथ्था येणार कोल्हापुरातून पुण्यात या ठिकाणी होणार लग्न

सिनेमा, मालिकांमधून आनंदी नवराबायको या भूमिका लोकप्रिय करणारे कलाकार खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार बनत आहेत. गेल्या काही दिवसात चाहत्यांना असा सुखद धक्का देत कलाकारांनी रिल लाइफमधील नातं रिअल लाइफमध्येही जगायचं ठरवलं आहे. यामध्ये जोरदार चर्चा झाली ती राणादा आणि पाठकबाई यांच्या साखरपुड्याची. राणादा म्हणजे हार्दिक जोशी आणि पाठकबाई म्हणजे अक्षया देवधऱ यांनी अक्षय्यतृतीयाच्या मुहूर्तावर एकमेकांच्या बोटात अंगठी घालून तुझ्यात जीव रंगला असं म्हटलं. आता ही जोडी लवकरच लग्न करणार आहे. दोघांच्याही लग्नाची धामधूम सुरू झाली असून लग्नसोहळा पुण्यात होणार आहे तर हार्दिक आणि अक्षया यांच्या लग्नाचे ड्रेस, साडी खास कोल्हापुरातून मागवण्यात येणार आहे.

hardik joshi and akshaya deodhar wedding
hardik joshi and akshaya deodhar wedding

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या जोडीने तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणादा आणि अंजली या भूमिका केल्या होत्या. दोघांचीही मुख्य भूमिका असलेली ही पहिलीच मालिका. कोल्हापुरात या मालिकेचं चित्रीकरण झालं. ही मालिका इतकी लोकप्रिय झाली की चार वर्षे ही मालिका सुरू होती. या मालिकेत हार्दिक आणि अक्षयाची खूप छान मैत्री झाली, पण दोघंही लग्न करतील असं त्यांच्या चाहत्यांना वाटलं नव्हतं त्याचं कारण म्हणजे अक्षया हार्दिकच्या नव्हे तर दुसऱ्याच एका अभिनेत्याच्या प्रेमात होती. त्यांचे एकत्र फोटो ती शेअर करत असल्यामुळे हार्दिक आणि अक्षयाचं जुळेल असं त्यांच्या चाहत्यांच्या मनातही आलं नाही. पण अक्षयाचा गेल्या वर्षी ब्रेकअप झाला तेव्हा हार्दिकने मित्र म्हणून तिला खूप आधार दिला. त्याच दरम्यान अक्षया आणि हार्दिक यांच्यात मैत्रीपलीकडचं नातं तयार झालं. गेल्या वर्षभरापासून राणादा आणि पाठकबाई खऱ्या आयुष्यात रिलेशनशीपमध्ये होते. त्यांनी साखरपुड्याचे फोटो शेअर करत लग्न करणार असल्याची गुडन्यूज दिली. काही दिवसांपूर्वी या जोडीने एकत्र सुट्टीही एन्जॉय केल्याचे फोटो शेअर केले. आता याचं लग्नं कधी होणार अशी चाहत्यांना उत्सुकता होती. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून अक्षया आणि हार्दिक यांनी त्यांच्या लग्नाचं स्थळ पुणे असेल असं जाहीर केलं आहे. विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचं लग्नं जिथे झालं तिथेच ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. त्यासाठी विराजस आणि शिवानीसोबत त्यांनी चर्चा केली आहे. पुण्यातील कर्वे नगर परिसरातील पंडित फार्म्स या ठिकाणी विराजस आणि शिवानीने लग्नगाठ बांधली होती याच ठिकाणी आता अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी लग्न करणार असे त्यांनी सांगितले आहे.

hardik and akshaya
hardik and akshaya

हार्दिक आणि अक्षयाच्या लग्नाचं अजून एक वैशिष्टय म्हणजे ज्या मालिकेमुळे ही जोडी एकत्र आली त्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या शूटिंगनिमित्ताने दोघांचाही मुक्काम कोल्हापुरात होता. साहजिकच कोल्हापूरशी दोघांचेही खास नातं आहे. कोल्हापुरातच त्यांचे सूर जुळले, याची आठवण कायम रहावी म्हणून लग्नाचे कपडे कोल्हापुरात तयार करून घेण्याचं दोघांनीही ठरवलं आहे. हार्दिक आणि अक्षया यांचा लग्नाचा लुक अस्सल कोल्हापुरी असणार आहे.
हार्दिक सध्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत सिध्दार्थची भूमिका करत आहे. तर अक्षयाचं मॉडेलिंग सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयाने हे तर काहीच नाय या शोचं निवेदन केलं होतं. अक्षया मूळची पुण्याची आहे तर हार्दिक मुंबईकर आहे. चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळे याने हार्दिकला विचारले की अक्षयाने कोणती गोष्ट बदलावी असं वाटतं तेव्हा हार्दिक म्हणाला होता की तिला लवकर राग येतो आणि रागाच्या भरात ती कशीही वागते. रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे ही हार्दिकची इच्छा अक्षयाला पूर्ण करावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button