९० च्या दशकात दूरदर्शन वाहिनीची (सह्याद्री) “गोट्या” ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. या मालिकेत गोट्याची भूमिका साकारली होती “जॉय घाणेकर” या बालकलाकाराने. गोट्या मालिकेमुळे लोकप्रियता मिळवलेला जॉय घाणेकर पुढे जाऊन मोजक्याच चित्रपटात बालकलाकार म्हणून झळकला. जॉय घाणेकर हा चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते “गिरीश घाणेकर” यांचा मुलगा होय. गिरीश घाणेकर यांनी श्याम बेनेगल यांच्या हाताखाली सहदिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी प्रेम करूया खुल्लम खुल्ला, हेच माझे माहेर, गोष्ट धमाल नाम्याची , राजाने वाजवला बाजा, बाळाचे बाप ब्रह्मचारी , नवसाचं पोर या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

नवसाचं पोर हा त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट ठरला होता. गिरीश घाणेकर यांचे भाऊ “नंदू घाणेकर” हे देखील संगीत दिग्दर्शक आणि अभिनेते, निर्माते म्हणून ओळखले जातात. नंदू घाणेकर यांनी ताऱ्यांचे बेट, नशीबवान या चित्रपटाला संगीत दिलं आहे याशिवाय काही न्यूज चायनलला देखील त्यांनी म्युजिक दिलं आहे. गिरीश घाणेकर आणि मीना घाणेकर यांना ध्रुव आणि जॉय ही दोन अपत्ये. हाजमोलाच्या जाहिरातीत आणि ‘त्रिकाल’ या श्याम बेनेगल यांच्या चित्रपटात हे दोघेही भाऊ एकत्रित झळकले होते. जॉयने गोट्या मालिकेव्यतिरिक्त राजाने वाजवला बाजा हा चित्रपट साकारला होता. पुढे अभिनय क्षेत्र सोडुन त्याने आपल्या शिक्षणावर अधिक भर दिला आणि सध्या यूएसला Talech कंपनीत प्रॉडक्ट हेड म्हणून कार्यभार सांभाळताना तो दिसत आहे. जॉयचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा देखील आहे. तर त्याचा थोरला भाऊ “ध्रुव घाणेकर” हा वयाच्या १० व्या वर्षापासूनच अल्बममधील गाणी गात होता. कालांतराने आवाजात बदल होत गेल्याने संगीत दिग्दर्शनाकडे त्याने आपली पाऊले वळवली. ध्रुव घाणेकर याने आजवर ३५०० व्यावसायिक जाहिराती, बॉलिवूड चित्रपट, वेबसिरीज यांना संगीत दिलं आहे.

आपल्या या कारकिर्दीत त्याने ५० इंटरनॅशनल अवॉर्डस देखील मिळवली आहेत. अभिनेत्री “ईशीता अरुण” ही ध्रुव घाणेकरची पत्नी आहे. ‘ ऐका दाजीबा…’ या मराठी गाण्यातून ईशीता पहिल्यांदाच मराठी सृष्टीत झळकली होती. लहानपणी साधारण ९० च्या दशकात ईशीता व्हीक्सच्या जाहिरातीत झळकली होती. ईशीता ही अभिनेत्री आणि गायिका ईला अरुण यांची एकुलती एक कन्या आहे. त्रिकाल या चित्रपटात जॉय आणि ध्रुव यांच्यासोबत त्यांनी एकत्रित काम केले होते तेव्हापासून घाणेकर कुटुंबाशी त्यांचे सख्य निर्माण झाले. आईच्या पावलावर पाऊल टाकत ईशीता देखील काही मोजक्या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली होती. ईशिता आणि ध्रुव घाणेकर यांना दोन मुली आहेत. अभिनेत्री ईशीता अरुण ही गोट्या मालिकेतील गोट्या म्हणजेच जॉय घाणेकरची वहिनी आहे हे बहुतेकांना माहीत नसावे. ह्या संपूर्ण कलाकार फॅमिलीला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…
