आज झी मराठी वाहिनीवरील होम मिनिस्टर या कथाबाह्य मालिकेत अभिनेत्री शलाका पवार आणि त्यांचे कुटुंब सहभागी होणार आहेत. शलाका पवार या मराठी नाट्य, चित्रपट तसेच मालिका अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. शलाका पवार या पूर्वाश्रमीच्या शलाका देसाई . त्यांचे आजोबा तैलचित्रकार होते त्यामुळे त्यांच्या आजोबांना कलेची आवड होती. शलाकाचे इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाले त्यामुळे मराठी कळत होती, बोलताही येत होती मात्र तिला वाचता येत नव्हती म्हणून त्यांच्या आजोबांनी तिला शिक्षक आणि नाट्यकलाकार असलेल्या रवी भाटवडेकर यांच्याशी ओळख करून दिली.

त्यांच्यामार्फत शलाकाचा नाटकांमधून प्रवास सुरु झाला. इरादा पक्का, मर्डर मेस्त्री, ऑल मोस्ट सुफळ संपूर्ण, गोठ, तू चांदणे शिंपित जाशी या चित्रपट आणि मालिकांमधून शलाका महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या. ‘यदा कदाचित’ या गाजलेल्या विनोदी नाटकात शलाकाने द्रौपदीची भूमिका साकारली होती. २७ वर्षांपूर्वी यदा कदाचित हे नाटक अभिनेता संतोष पवार ह्याने मंचावर आणलं आणि प्रेक्षकांकडून हे नाटक तुफान लोकप्रियता मिळवून गेलं. ह्याच नाटकातून संतोष पवार आणि शलाका एकत्रित प्रेक्षकांसमोर आले आणि त्यांनी लग्नही केले. आज त्यांच्या लग्नाला जवळपास २० वर्षे उलटून गेली आहेत. हास्या हे त्यांच्या मुलीचं नाव तर केशा हे त्यांच्या मुलाचं नाव आहे. संतोष पवार हा मराठी सृष्टीतील अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, गीतकार म्हणून ओळखला जातो. शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून त्याने सुरुवातीला केदार शिंदे, अंकुश चौधरी, भरत जाधव यांच्यासोबत काम केले इथूनच ही सर्व कलाकार मंडळी एकमेकांची साथ धरून मराठी प्रेक्षकांसमोर एका पेक्षा एक अफलातून कलाकृती घेऊन आले.

यदा कदाचित या नाटकाच्या लोकप्रियतेनंतर आम्ही सारे लेकुरवाळे, आलाय मोठा शहाणा, दिली सुपारी बायकोची, युगे युगे कलियुगे, स्वभावाला औषध नाही, दिनूच्या सासूबाई राधाबाई यासारखे नाटक लेखक, दिग्दर्शक तर कधी अभिनेता बनून प्रेक्षकांसमोर आणले. ऑन ड्युटी चोवीस तास या चित्रपटाच्या कथालेखनाचे काम त्याने केले होते. मी आणि शाहीर साबळे हा त्याने आणलेला रंगमंचावरील कार्यक्रम प्रेक्षकांनी आपलासा केला. या प्रवासात त्याने अनेक नवख्या कलाकरांना देखील अभिनयाची संधी मिळवून दिली हे विशेष. यदाकदाचित रिटर्न्स हे नाटक त्याने प्रेक्षकांच्या भेटीला आणले हे नाटक यदाकदाचित पेक्षा खूप वेगळे आहे. या नाटकातून शेतकऱ्याला भेडसावणाऱ्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम त्याने केले आहे.आज होम मिनिस्टरच्या भागात शलाका आणि संतोष पवार यांची एन्ट्री होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या भागाची उत्सुकता आहे. संध्याकाळी६ वाजता हा भाग झी मराठी वाहिनीवर तुम्हाला पाहायला मिळेल.