“घर संसार” हा चित्रपट १९९८ साली प्रदर्शित झाला होता. निशिगंधा वाड, दीपक देऊळकर, उदय टिकेकर, रुपाली देसाई, नयना आपटे, सुधीर जोशी या कलाकारांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात उदय टिकेकर यांच्या पत्नीची म्हणजेच सुमनची भूमिका साकारली होती अभिनेत्री “रुपाली देसाई” यांनी. रुपाली देसाई या मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातातच परंतु त्यांनी आज आपली एका वेगळ्या क्षेत्रात ओळख निर्माण केली आहे याबाबत अधिक जाणून घेऊयात…

रुपाली देसाई या पूर्वाश्रमीच्या रुपाली वैद्य. त्यांनी लहानपणापासूनच नृत्याचे धडे गिरवले असून त्या प्रोफेशनल कथ्थक विशारद आहेत आणि बीए एल एल बी ची त्यांनी पदवी मिळवली आहे. प्रसार भारतीतर्फे वर्गीकृत केलेल्या आर्टिस्ट म्हणूनही त्या ओळखल्या जातात तर दिल्ली श्रीनगरमणी अवॉर्ड त्यांना प्रदान करण्यात आला आहे. आज मोठमोठ्या मंचावरून त्या आपल्या नृत्याची कला सादर करताना दिसत आहेत. रुपाली देसाई यांनी सुरुवातीला आदेश बांदेकर सोबत दुर्दशन वरील “ताक धिना धीन” या लोकप्रिय शोचे सूत्रसंचालन केले होते. देव नवरी, असेच आम्ही सारे, श्री तशी सौ, उंच माझा झोका गं, अनोळखी ओळख, झालं एकदाचं अशा कित्येक नाटकांतून नयना आपटे, सुधीर जोशी, स्मिता तळवलकर, अशोक सराफ यांच्यासोबत महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. रुपाली देसाई या अभिनेते श्रीकांत देसाई यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आहेत. श्रीकांत देसाई हे गेल्या ३४ वर्षांपासून मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. नाटक आणि मालिकांमधून त्यांनी सहाय्यक, चरित्र तसेच विरोधी भूमिका साकारल्या आहेत.

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून मुघल सरदाराची भूमिका त्यांनी साकारली होती याशीवाय मोरूची मावशी नाटक, लेक माझी लाडकी सारख्या अनेक मालिकेतून ते कधी वडिलांच्या भूमिकेत तर कधी विरोधी भूमिकेत पाहायला मिळाले. रुपाली देसाई यांनी “संस्कृती नृत्य कला मंदिर” या नावाने स्वतःची डान्स अकॅडमी सुरू केली आहे. रुपाली आणि श्रीकांत देसाई यांना दिशा ही मुलगी आहे. वयाच्या अडीच वर्षांपासूनच दिशा आपल्या आईकडून नृत्याचे धडे गिरवत होती. पुढे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून तिने विशारद पूर्ण केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात कथ्थक नृत्य मुंबई विभागातून प्रथम क्रमांकाचे तसेच सुवर्णपदक तिला प्रदान करण्यात आले होते शिवाय नृत्य क्षेत्रात अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या “मेनका ट्रॉफी”ची ती मानकरी ठरली आहे. आज रुपाली देसाई अभिनय क्षेत्रापासून काहीशा दुरावलेल्या दिसत असल्या तरी नृत्याची त्यांची आवड जोपासताना दिसत आहेत.