मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांनी अभिनय क्षेत्रासोबतच व्यवसाय क्षेत्रात उतरण्याचे धाडस दाखवले आहे. यात बहुतेक कलाकारांना यश मिळाले आहे तर कोणी आपला व्यवसाय अर्धवट देखील सोडला आहे. अभिनेता संग्राम साळवी, शंतनू मोघे, शशांक केतकर, प्रिया बेर्डे यांनी स्वतःचे हॉटेल तसेच कॅफे सुरू केले. परंतु शशांक केतकरने काही दिवसांपूर्वीच पुण्यात असलेले ‘आईच्या गावात ‘ हे हॉटेल बंद केले आहे तर प्रिया यांनी कोथरूड परिसरात ‘चख ले ‘ या नावाने हॉटेल सुरू केले आणि यात आणखी एक पाऊल पुढे टाकत त्यांनी याच नावाने पुण्यात दुसरे हॉटेल देखील सुरू केले आहे.

व्यवसाय क्षेत्रातील हा अनुभव आता अभिनेता यशोमन आपटे हा देखील स्वीकारताना दिसत आहे. नुकतंच यशोमनने ठाण्यात स्वतःचे ‘कॅप्टन कुल’ या नावाने कॅफे सुरू केले आहे. आज या कॅफेचे उदघाटन झाले असून अभिनेता अभिजित केळकर, आशिष जोशी, स्वानंदी टिकेकर यांनी त्याच्या कॅफेला भेट दिली आहे. ह्या कॅफेमध्ये विविध प्रकारचे शेक, थंड पदार्थ, आईस क्रिम आणि आणखीन बरच काही मिळणार आहे. यशोमन आपटेने संत ज्ञानेश्वर या मालिकेतून छोट्या पडद्यावर आगमन केले होते. या मालिकेत त्याने संत सोपानदेवांची भूमिका निभावली होती. झी युवा वरील फुलपाखरू या मालिकेने त्याला अमाप लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेत त्याने निभावलेला मानस आणि हृता दुर्गुळेने साकारलेली वैदेही प्रेक्षकांना प्रचंड वेड लावून गेली. तुझ्या विना, झोपाळा, बीपी, लौट आओ गौरी, ३५% काठावर पास, श्रीमंताघरची सून, तू इथे जवळी रहा अशा चित्रपट, नाटक तसेच मालिकांमधून तो महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाला. यशोमनला गाण्याची देखील आवड आहे.

सोनी मराठी वरील सिंगिंग स्टार या रिऍलिटी शोमधून त्याच्या गायकीची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. कॉलेजमध्ये असताना यशोमनने अनेक बक्षिसं पटकावली होती. त्यामुळे एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्याने मराठी सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. यशोमनचे वडील फ्रिलांसर लेखक आहेत तर त्याचे काका दिवंगत अभिनेते विनय आपटे हे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून मराठी सृष्टीत ओळखले जातात. कलेचा वारसा घरातूनच मिळाल्याने यशोमनने कॉलेजमध्ये गेल्यावर रंगभूमीवर पदार्पण केले होते. यशाची एक एक पायरी चढत तो आता व्यवसाय क्षेत्राचा देखील अनुभव घेत आहे. ठाण्यात सुरू केलेल्या ‘कॅप्टन कुल’ शेक आणि थंड पदार्थांच्या या त्याने सुरू केलेल्या नव्या कॅफेला दिवसेंदिवस भरभराटी मिळो हीच एक सदिच्छा…