आपल्या वाहिनीचा टीआरपी वाढवण्यासाठी आयोजक वेगवेगळ्या उपाययोजना करतात. अर्थात दर्जेदार मालिका असल्या की प्रेक्षक आपोआप त्या वाहिनीला टीआरपी मिळवून देतो हे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये राखी सावंतला आणले आहे. राखी सावंतच्या येण्याने शोला चांगला टीआरपी मिळाला असल्याचे दिसून येते. मात्र एकेकाळी या स्पर्धेत नंबर एकचे स्थान स्थान पटकावणाऱ्या झी वाहिनीला हे आव्हान थोडेसे कठीण जाताना दिसत आहे. कारण झी मराठी वाहिनीच्या सर्वच मालिका नव्याने सुरू झालेल्या आहेत. नव्या दमाच्या मालिका आणि प्रसिद्ध नायक नायिकेला या वाहिनीने प्राधान्य दिले असल्याने वाहिनीचा टीआरपी वाढणार अशी आशा आयोजकांना होती. मात्र ३ नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या फु बाई फु या शोचा टीआरपी घटल्याने अवघ्या महिन्याभरातच या शोने आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे.

फु बाई फु या शो चे हे दहावे पर्व होते गेल्या ९ पर्वाला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद यावेळी मात्र थंडावलेला पाहायला मिळाला. या शोमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजनेला संधी देण्यात आली होती. अर्थात प्ररक्षकांचे ओंकारवर प्रचंड प्रेम आहे त्याने अभिनयाच्या जोरावर मिळवलेली प्रसिद्धी फु बाई फु ला मिळू शकते असा विश्वास या वाहिनीला होता. ओंकार महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडतोय यावर देखील अनेक चर्चा सोशल।मीडियावर पाहायला मिळाल्या. मात्र पहिल्या एपिसोड पासूनच फु बाई फु ला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळाला. इथे ओंकारचीच काय पण कोणत्याही कलाकाराची जादू प्रेक्षकांना आपल्याकडे खेचू शकली नाही त्यामुळे अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीतच या शोने आपला गाशा गुंडाळण्यास सुरुवात केलेली आहे. पंढरीनाथ कांबळे याने देखील हास्यजत्रा सोडून फु बाई फु च्या शोमध्ये सहभाग घेतला होता. प्राजक्ता हनमघर, नेहा खान, सागर कारंडे, कमलेश सावंत , प्रणव रावराणे, कमलाकर सातपुते असे नामवंत विनोदी कलाकार असूनही शो चा दर्जा सुरुवातीपासूनच खाली घसरलेला पाहायला मिळाले. त्यांनी केलेल्या काही मोजक्या स्कीट्सची वाहवा जरी झाली असली तरी लोकांनी या शोकडे पाठ फिरवलेली दिसून आली होती.

त्यात अभिनेता उमेश कामतचे विनोदी सादरीकरणावर उगाचच खळखळून हसणे प्रेक्षकांच्या पचनी पडले नाही. त्यामुळे झी वाहिनीने हा शो रद्द करण्याचा निर्णय घेतला. येत्या २१ डिसेंबर पासून फु बाई फु शोच्या ठिकाणी प्रेक्षकांना आता नवीन मालिका पाहायला मिळणार आहेत. स्पृहा जोशी आणि क्षितिश दाते यांची प्रमुख भूमिका असलेली लोकमान्य ही मालिका रात्री ९.३० वाजता प्रसारित केली जात आहे तर सुकन्या कुलकर्णी आणि स्वानंदी टिकेकर यांची प्रमुख भूमिका असलेली अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई? ही मालिका बुधवार ते शनिवार रात्री १० वाजता प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेचे प्रोमो काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते त्यावेळी प्रेक्षकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. अभिनेत्री स्पृहा जोशी देखील बऱ्याच वर्षा नंतर मालिकेत काम करताना पाहायला मिळणार आहे. स्पृहा जोशी आणि क्षितिश दाते यांना “लोकमान्य” मालिकेतही खूप खूप शुभेच्छा..