गेल्या दोन वर्षाचा काळ आठवला तरी नको वाटतं. घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावावाच लागायचा. फेसशील्ड लावून अनेकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतरही मास्क काही हटला नव्हता. पण गेल्या दोन महिन्यांपासून मास्क पूर्णपणे बंद झाला. ठप्पं झालेल्या गोष्टी रूळावर आल्या. कोरोनाचा धोका टळल्याने मास्कबंदीचा आनंद प्रत्येकजण घेत असताना आयपीएलच्या मैदानावर क्रिकेटपटू ऋषी धवन फेसशील्ड घालून उतरला आणि अख्ख्या क्रिकेटप्रेमींच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. कोरोनाचा धोका तर नाही, मग ऋषी धवनला फेसशील्डची गरज का लागली अशा प्रश्नांना उधाण आलं. ऋषीनेच त्याचं कारण सांगत उत्सुकता संपवली.

खेळाडूंची कोरोना चाचणी करूनच त्यांना प्रवेश दिला जातो. शिवाय खेळाडू हे बायोबबलध्ये असतात. पंजाब किंग्जचा अष्टपैलू क्रिकेटर ऋषी धवनची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तरीही हा पठ्ठ्या फेसमास्क लावून मैदानात आला. पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात पंजाबकडून ऋषी खेळत होता. सामना चांगलाच रंगात आला होता. ऋषी या सामन्यात गोलंदाजी करत असताना त्याच्या फेसशील्डची उत्सुकता काही केल्या त्याच्या चाहत्यांच्या आणि क्रिकेटप्रेमींच्या मनातून जात नव्हती. संपूर्ण सामन्यातील दोन्ही संघापैकी एकाही खेळाडूने मास्क लावला नसताना ऋषीच्याच चेहऱ्यावर मास्क का? कोरोनाच्या शंकेनेही अनेकाच्या मनात भीतीने दार ठोठावले. ऋषीच्या या फेसशील्डवरून त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर माहिती घेणाऱ्या पोस्टही केल्या. अखेर ऋषीने खरं कारण सांगत चाहत्यांच्या मनातील प्रश्न थांबवले बास्केटबॉल खेळात अशा प्रकारचा मास्क खेळाडू वापरतात. नाकाला दुखापत होऊ नये यासाठी असा मास्क वापरला जातो. काही दिवसांपूर्वी ऋषी धवनच्या नाकाला दुखापत झाली होती. त्या दुखापतीवर ऋषी धवन उपचार घेत होता.

पण उपचाराने त्याची जखम बरी न झाल्याने त्याच्या नाकावर छोटी शस्त्रक्रिया करावी लागली. ऋषी धवन हा जलदगती गोलंदाज असल्याने बॉलिंग करताना ऋषी पीचच्या मध्यापर्यंत जातो. फलंदाजाकडून बॉलचा फटका ऋषीच्या चेहऱ्यावर लागण्याची शक्यता असते. यावरच खबरदारीचा उपाय म्हणून नाकाला दुखापत होऊ नये यासाठी ऋषीने या सामन्यात फेसशील्ड वापरले. कोरोनाची भीती किंवा लक्षणे नसून केवळ नाकावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर काळजी घेण्यासाठीच ऋषीने फेसशील्डचा वापर केल्याचे खरं कारण त्याने सांगितले. या सामन्यान ऋषीने गोलंदाज म्हणून भरीव कामगिरीही केली. प्रतिस्पर्धी चेन्नईचा फलंदाज शिवम दुबेला त्रिफळाचित करून संघाला मोठे यश मिळवून दिले. मात्र या सामन्यातील त्याच्या खेळाइतकीच चर्चा रंगली ती त्याच्या फेसशील्डची.