मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतला एक सुवर्ण काळ अनुभवलेले ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या अवॉर्ड सोहळ्यात त्यांनी हजेरी लावली होती. रमेश देव यांचा जन्म अमरावतीचा मात्र जोधपूर राजस्थान येथे त्यांच्या कुटुंबाची नाळ जोडली गेली होती.रमेश देव यांचे वडील कोल्हापूर येथे जज म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आजोबा आणि पणजोबांनी जोधपूर पॅलेस बांधले होते. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूर येथे बोलवले होते.

आंधळा मागतोय एक डोळा या चित्रपटातून रमेश देव यांनी मराठी सृष्टीत पाऊल टाकले होते. देवघर, माझी आई, भाग्यलक्ष्मी, आरती, आनंद, आपकी कसम, मेरे अपने अशी जवळपास २८५ हिंदी चित्रपट आणि दीडशेहून अधिक मराठी चित्रपट त्यांनी आपल्या सजग अभिनयाने गाजवली होती. रमेश देव यांचे मुंबईत खूप मोठं घर आहे याठिकाणी अमिताभ बच्चन नेहमी भेट द्यायला यायचे. माझ्यापेक्षाही तुमचं घर मोठं आहे असे म्हणून ते रमेश देव यांच्या घराची तारीफ करायचे. रमेश देव यांचे सीमा देव यांच्यासोबत लग्न झाले त्यावेळी मराठी सृष्टीतील सर्वात मोठे लग्न म्हणून रमेश देव आणि सीमा देव यांचे लग्न गाजले होते. कोल्हापूर येथे मोठ्या थाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता त्यावेळी हजारो लोकं त्यांच्या लग्नाला हजेरी लावून गेले होते. हिंदी आणि मराठी सृष्टीत त्यांनी जवळपास सहा दशकाहून अधिक काळ आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अशा दिग्गज कलाकाराने अचानक एक्झिट घेतल्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. रमेश देव यांना आमच्या संपूर्ण टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
